News Flash

अधिकृत निवडणूक निकालाला मध्यरात्र होणार?

प्रत्येक फेरीला साधारणपणे ५० मिनिटे ते एक तासाचा वेळ लागेल, असे मुद्गल म्हणाले.

मतमोजणी तयारीबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल.

मतमोजणीचा विलंब कमी करण्याचे प्रयत्न; रामटेकच्या निकालाला नागपूरपेक्षा जास्त उशीर

नागपूर : निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ ते १८ तास लागणार असल्याने लोकसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होण्यास मध्यरात्र किंवा त्याही पेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उशिरापर्यंत जाहीर निकालाच्या कलावरूनच कोण जिंकणार, याबाबत अंदाज बांधावा लागणार आहे. दरम्यान, होणारा विलंब कमी करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे.

जिल्ह्य़ातील नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना बाजार समितीच्या परिसरात होणार आहे. याबाबतच्या तयारीची माहिती आज मंगळवारी जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्ट्राँगरूमधून मतदान यंत्र बाहेर काढण्यापासून तर ते मतमोजणीच्या टेबलवर नेईपर्यंत आणि व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठय़ांची मोजणी करेपर्यंतच्या सर्व प्रक्रियांची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रत्येक फेरीला किमान ५० मिनिटे ते एक तासाचा वेळ लागणार आहे. सरासरी १७ ते १८ फे ऱ्या होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा निर्धारित वेळ लक्षात घेता अधिकृत निकाल जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

सकाळी ८ वाजतापासून टपाल मतपत्रिकांच्या मोजणीने मतमोजणीस सुरुवात होईल व सर्वात शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठय़ा मोजण्यात येतील. साधारणपणे ९ वाजतापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. पहिली फेरी साधारणपणे एक तासाने म्हणजे १० वाजता जाहीर होईल. त्यानंतर प्रत्येक फेरीला साधारणपणे ५० मिनिटे ते एक तासाचा वेळ लागेल, असे मुद्गल म्हणाले.

टेबलची संख्या वाढवली

एक फेरी पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीची मोजणी करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश होते. यामुळे मोजणीची प्रक्रिया  प्रदीर्घकाळ चालण्याची शक्यता होती. त्यामुळे आयोगाच्याच परवानगीने यात थोडी शिथिलता आणून एक फेरी झाल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या मोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच टेबलची संख्या १४  वरून यावेळी २० वर नेण्यात आली आहे. मतमोजणीला होणारा विलंब कमी करण्याचा हा प्रयत्न आहे, असे निवडणूक  अधिकाऱ्यांनी सांगितले.

मतमोजणी निरीक्षक दाखल

केंद्रीय निवडणूक आयोगाने नागपूरसाठी दोन तर रामटेकसाठी तीन मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती केली असून ते शहरात दाखल झाले आहेत. नागपूरमधील दक्षिण, द.पश्चिम आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी शारदादेवी यांची, मध्य  पूर्व आणि उत्तर नागपूरसाठी रवींद्र नायक यांची तर रामटेकमध्ये सावनेर, हिंगणा विधाससभेसाठी जे. प्रसन्ना, कामठी आणि रामटेकसाठी  जितूसिंग आणि उमरेड, काटोलसाठी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशी होईल मतमोजणी

कळमना बाजारातच स्ट्राँगरुम आहे. ती सकाळी ६.३० वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर उघडण्यात येईल. जीपीएस वाहनाने हे यंत्र मतमोजणीस्थळी आणले जातील. येथे विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी २० टेबल असे नागपूरसाठी १२० आणि रामटेकसाठी १२० टेबल लावण्यात आले आहेत.  प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी असतील शिवाय एक ‘रो ऑफिसर’ असेल. एकूण ८८८ कर्मचाऱ्यांची मदत या कामासाठी घेण्यात येईल. एका बाजूला उमेदवारांच्या प्रतिनिधीला बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एका फेरीत एका विधानसभा मतदारसंघातील १३० केंद्रांवरील मतांची मोजणी होईल. अशाच प्रकारे सहा विधानसभा मतदारसंघाची मोजणी होईल. त्यानंतर सर्व मतांची बेरीज करून ती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतर फेरीचा कल जाहीर होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीची मोजणी सुरू होईल. अशा १७ ते १८ फेऱ्या नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघासाठी होतील.

विलंबाची कारणे

ईव्हीएमबाबत होणारे आरोप लक्षात घेऊन यावेळी निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत कठोर नियमावली तयार केली आहे. त्यामुळे मतमोजणीला विलंब होणार आहे. स्ट्राँगरूममधून ईव्हीएम यंत्र काढताना त्याचे क्रमांक नोंदवून घेणे, उमेदवारांच्या प्रतिनिधींना ते दाखवणे, मतमोजणीस्थळी आणल्यावर क्रमांकाची खातरजमा करणे, टपाल मतपत्रिका मोजताना चार वेळा बारकोडचे स्कॅनिंग करणे, मतांची बेरीज संगणक तसेच मॅन्युअली असे दोन्ही पद्धतीने करणे, प्रत्येक फेरीचे निकाल मतमोजणी निरीक्षकांकडे पाठवणे, निरीक्षकांकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील दोन टेबलवर जाऊन मतमोजणीची पडताळणी करणे तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच याप्रमाणे नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील एकूण ६० व्हीव्हीपॅटमधील प्रत्येक मतचिठ्ठी मोजणे व त्यानंतर निकाल जाहीर करणे यात वेळ जाणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी २४ बाय ७ काम

मतमोजणीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पहाटे पाच वाजता मतमोजणीस्थळी बोलावण्यात आले आहे. ६.३० वाजता स्ट्राँगरूम उघडण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीच्या आधी प्रात्यक्षिक होईल. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होईल. सध्याच्या अंदाजानुसार मोजणी संपायला मध्यरात्र होणार आहे. यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो हे लक्षात घेऊन दोन सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. काही कर्मचारी राखीव म्हणून मतमोजणीस्थळीच हजर राहतील. एखाद्या कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली तर तत्काळ त्याच्या ऐवजी दुसरा कर्मचारी बोलावला जाईल तसेच मध्यरात्रीनंतर मतमोजणी चालली तर दुपारच्या सत्रात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जाईल. कर्मचाऱ्यांचा ताण वाढू नये म्हणून त्यांना जागेवरच खाद्यपदार्थासह नाश्ता, चहा, थंडपेयाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्लुकोज, ओआरएस पावडरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2019 3:09 am

Web Title: official election result will be announce in the midnight
Next Stories
1 विजय आपलाच – आंबेडकर
2 मोदींच्या नेतृत्वावर विश्वास
3 मतदान यंत्रे सुरक्षित!
Just Now!
X