21 September 2020

News Flash

समाजमाध्यमांवर ‘आपले’पणाचा भडिमार

फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यावरही त्यांचा भर आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पोस्ट, चित्रफिती, संदेश, ‘लाइव्ह चॅट’च्या माध्यमातून ऑनलाइन प्रचार

कुणी ‘आपलीमुंबईचीमुलगी’ तर कुणी ‘हमारामनोज’ तर आणखी कुणी ‘आपला माणूस’.. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवत असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या समाजमाध्यमांवरील ‘आपले’पणाचा मतदारांना चांगलाच अनुभव येत आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व आपला प्रचार करण्यासाठी सर्वच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत.

मुंबईतील उमेदवारांमध्ये प्रिया दत्त, पूनम महाजन, ऊर्मिला मातोंडकर, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत, मिलिंद देवरा यांच्यात समाजमाध्यमांमध्ये जास्त चढाओढ दिसत आहे. प्रिया दत्त यांनी फेसबुकवरून त्यांचा जाहीरनामा प्रसारीत केला आहे. दिवसभरातील मतदारांच्या गाठीभेटी, छायाचित्रे, प्रचारफेरीतील अनुभव त्या फेसबुकवर मांडतात. दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक, सभांच्या वेळा, ठिकाण याची पूर्वसूचनाही समाज माध्यमांवरून दिली जाते. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यावरही त्यांचा भर आहे.

काही उमेदवार भाषेच्या वापराबाबतही काटेकोर आहेत. पूनम महाजन या सर्व ‘पोस्ट’ मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांतून करतात. तर प्रिया दत्त इंग्रजीमधून ‘पोस्ट’ करत असतात. राहुल शेवाळे यांच्या खात्यावरून प्रसारीत होणारा मजकूर फक्त मराठीतूनच असतो.

समाजमाध्यमांवर उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर देखील चांगल्याच सक्रीय आहेत. त्यांच्या संवादाचे प्रमुख माध्यम इंग्लिश असले तरी ‘आपलीमुंबईचीमुलगी’ हा त्य़ांचा ‘हॅशटॅग’ आहे. ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून त्या नेटकरींशी संवादही साधतात.

ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी आपल्या परीसरातल्या रहिवाशांच्या आपल्या कामाविषयी प्रतिक्रिया घेऊन ‘हमारा मनोज’ नावाची चित्रफित प्रसारीत केली आहे. मुंबईतील भाजपचे सर्वाधिक अनुभवी व ६५ वय असलेले उमेदवार उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी हेही फेसबुकवर सक्रिय असतात. त्यांच्या पोस्ट मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असतात. त्यांच्या सभा ‘लाईव्ह’ पाहता येतात.  तसेच कार्यालयातून फेसबुक लाईव्हव्दारे मतदारांशी संवाद साधत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो.

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांनी ‘आपला मानूस’ या दोन शब्दांतून समाजमाध्यमांवर मतदारांना साद घातली आहे. तर शिवसेनेच्या राहुल शेवाळे ‘पुन्हा एकदा राहुल शेवाळे’ हा हॅशटॅग वापरत सक्रीय झाले आहेत. ‘स्मार्ट मतदार संघासाठी, स्मार्ट खासदार निवडा’ असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘तुमचा विश्वासच मला काम करण्याचे बळ देतो’, अशा आशयाच्या चित्रफितींचा वापर गजानन किर्तीकर यांनी केला आहे. काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी ‘माय व्हिजन फॉर साऊथ मुंबई’ नावाने एक ध्वनीचित्रफित शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी महिलांसाठी, तरुणांसाठी एक कौन्सिल स्थापन करेन, घराचा प्रश्न, संसदेत लोकहिताचे मुद्दे, समस्या मांडणे, पारदर्शक कारभार यावर भर दिला आहे.

सर्वाधिक ‘पाठीराखे’ पूनम महाजन यांचे

समाजमाध्यमांवर पूनम महाजन यांचे इतर उमेदवारांपेक्षा अधिक ‘फॉलोअर्स’ आहेत. त्याखालोखाल प्रिया दत्त, मिलिंद देवरा, उर्मिला मातोंडकर, अरविंद सावंत, गोपाळ शेट्टी यांचा क्रमांक लागतो. मिलिंद देवरा ट्विटरवर तर उर्मिला या इन्स्टाग्रामवर आघाडीवर आहेत.समाजमाध्यमांवर गोपाळ शेट्टी, संजय दिना पाटील, मनोज कोटक, संजय निरुपम, एकनाथ गायकवाड, गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांना म्हणावा तेवढा चांगला प्रतिसाद नाही. परंतु, प्रिया दत्त, पूनम महाजन, उर्मिला मातोंडकर, मिलिंद देवरा यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:15 am

Web Title: online publicity through post video message live chat
Next Stories
1 मी उमेदवार : उत्तर पश्चिम मुंबई
2 प्रचाराचे रंग-ढंग : एकनाथ गायकवाड यांचा जाहीर, चौकसभांवर भर
3 मी उमेदवार : ईशान्य मुंबई
Just Now!
X