पालकमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, मात्र संभ्रम कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी नगरमध्ये होणाऱ्या प्रचार सभेत काँग्रेसचे स्टार प्रचारक व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार का, याबद्दल भाजपकडून आज, बुधवारी सायंकाळपर्यंत तरी स्पष्टपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नसल्याने विखे यांच्या प्रवेशाचा संभ्रम कायम आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून विखे व भाजपातील अंतर कमी झाले असून, त्यांचा प्रवेश कधी होणार, ते कधी भाजपात येणार यापेक्षा त्यांच्याकडे दुसरा पर्यायही आता शिल्लक नसल्याचे सूचक वक्तव्य पालकमंत्री राम शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव व भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी नगरमध्ये येत आहेत. या दौऱ्याची माहिती देताना पालकमंत्री शिंदे यांनी हे सूचक वक्तव्य केले. पक्षाचे निरीक्षक, प्रदेश महामंत्री आ. सुजितसिंह ठाकुर, महापौर बाबासाहेब वाकळे, सेनेचे माजी आमदार अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अ‍ॅड. अभय आगरकर आदी या वेळी उपस्थित होते.

मोदी यांच्या सभेसाठी दोन लाखांहून अधिक नागरिक उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आल्याची माहिती देऊन आ. ठाकुर यांनी सांगितले, की मोदी यांचे सकाळी विमानाने शिर्डीला व तेथून साडेनऊ वाजता नगरमध्ये लष्कराच्या हेलिपॅडवर आगमन होईल. तेथून ते सभेला येतील. सभेसाठी सावेडीतील जॉगिंग पार्कजवळील २१ एकर मैदान तयार करण्यात आले आहे. ८० गुणिले ४० फुट व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. सभेकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनतळाची सुविधा करण्यात आली आहे. मोदी यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी उपस्थित असतील.

चिरंजीवांच्या प्रचारात विरोधी पक्षनेते विखे सक्रिय झाले आहेत, मोदी यांच्या सभेच्या पूर्वतयारीच्या बैठकांनाही त्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांचा प्रवेश होणार का, याचीच अधिक उत्सुकता व्यक्त केली जात आहे. राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबद्दल आ. ठाकुर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मोदींच्या सभेत प्रवेशाबाबत अद्याप कुठलेही नियोजन नसल्याचे सांगत, याबाबत विखे यांनीच सांगितले पाहिजे, असे ते म्हणाले. पालकमंत्री शिंदे यांना याबाबत विचारले असता, त्यांनीही स्पष्टपणे न बोलता सूचक वक्तव्य केले. राधाकृष्ण विखे हे विरोधी पक्ष नेते असले, तरी भाजप उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय असल्याचा आम्हाला आनंद आहे. मागील काही दिवसांत आमच्यातील अंतर कमी होत गेले आहे. परवा तर अगदीच कमी झालेले आहे. त्यामुळे ते प्रवेश कधी करणार, सभेत प्रवेश होणार का, यापेक्षा त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नसल्याचे शिंदे यांनी नमूद केले. त्यामुळे विखेंच्या प्रवेशाबाबत संभ्रम कायम असल्याचेच सध्याचे चित्र आहे.