अशोक चव्हाण यांची टीका

धुळे : भाजपला देशभक्तीचा कोणताही चेहरा नाही. देशासाठी त्यांनी काहीच केले नाही. याउलट काँग्रेसची परंपरा देशभक्तीची आहे. देशासाठी बलिदान देणारे केवळ काँग्रेसचे नेतृत्व आहे. भाजप आणि इतर जातीयवादी पक्ष देशाला घातक आहेत. एकिकडे गुन्हेगारांना समर्थन आणि दुसरीकडे देशभक्तांचा अपमान, हे कोणत्या राष्ट्रभक्तीत बसते, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

धुळे लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी चव्हाण यांची शिंदखेडय़ात, तर शिरपूरमधील फार्मसी कॉलेज मैदानावर गुरुवारी नंदुरबार लोकसभा मतदार संघातील उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्या प्रचारार्थ सभा झाली. शिंदखेडय़ातील सभेत देशाला खोटा बोलणारा, कुठल्याही आश्वासनाची पूर्तता न केलेला खोटारडा पंतप्रधान लाभला, असल्याची टीका चव्हाण यांनी केली. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे नाव न घेता भाजप दहशतवादाचे समर्थन करीत असून देशद्रोहाचा गुन्हा असलेल्यांना उमेदवारीबद्दल माफी मागावी, तसेच त्यांची उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले. धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील बहुतांशी विकासाच्या योजना काँग्रेसनेच पूर्ण केल्या आहेत. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग आणि सुलवाडे-जामफळ या योजनांचे श्रेय लाटायची भाजपला काहीच गरज नाही. त्याचे अद्याप कामही सुरू झालेले नाही. मग त्याचा बाऊ  कशासाठी केला जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या वेळी आमदार मुझफ्फर हुसेन, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार रामकृष्ण पाटील, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक श्याम सनेर यांनी केले.

शिरपूरच्या सभेत चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना आता देशातील जनताच या चौकीदाराला चोर म्हणू लागले असल्याचे सांगिते. पाच वर्षांत भ्रष्टाचाराचा कळस यांनी गाठला. भाजपमधील भ्रष्टांना ‘क्लीनचीट’ आणि इतरांच्या मागे सीबीआयसारख्या संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. संवैधानिक संस्था मोडकळीस निघाल्या. या संस्थांचे अधिकार गोठविले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तींना जनतेसमोर येत सरकारचा हुकूमशाही कारभार सांगावा लागता आहे. यामुळेच या हुकूमशहाला आता घरी बसवून जनतेला न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा देशात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची गरज  चव्हाण यांनी मांडली. व्यासपीठावर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, भुपेशभाई पटेल, तपनभाई पटेल, उमेदवार पाडवी आदी उपस्थित होते.