अमित उजागरे/कृष्णा पांचाळ

पिंपरी-चिंचवड परिसरातील केंद्र शासनाच्या मालकीची असणारी प्रतिजैविकं तयार करणारी कंपनी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (एचए) वाचवण्यासाठी आणि इथल्या कामगारांच्या हितासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले असल्याची भावना कंपनीतील कामगारांनी व्यक्त केली आहे. आता यापुढे जो कोणी निवडून येईल त्याने हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा अशी मागणी इथल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

एचए कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे त्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणूक. मावळ लोकसभा मतदारसंघामधील महत्वाच्या प्रश्नांमध्ये एचएच्या प्रश्नाचाही उल्लेख केला जातो. सध्याच्या निवडणूक प्रचारामध्ये या कंपनीचा मुद्दाही अनेकदा उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकसत्ता डॉटकॉमने इथल्या कामगारांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात इथल्या कामगारांची अवस्था बिकट असल्याचे चित्र आहे. २५ वर्षे काम केल्यानंतरही महिन्याला ५ हजार रुपये इतका नाममात्र पगार सध्या या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून दिला जात आहे. कंपनीतील अनेक युनिट सध्या बंद आहेत. मात्र, नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर यातील चार ते पाच युनिट पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.

टाइम ऑफिसमध्ये काम करणारे अजय येलपुरे सांगतात की, २२ महिने झाले तरी पगारच झालेले नाहीत केवळ नाममात्र ५ हजार रुपये महिन्याला दिले जात आहेत. यामुळे खूपच अडचणीत असून आमच्या मुलांची लग्नाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च परवडणार नाही. कंपनी ही संपूर्णपणे केंद्र सरकारवर अवलंबून असल्याने लोकप्रतिनिधींनी आमच्यासाठी आवाज आठवणे गरजेचे आहे.

मनिष जांबूकर हे इलेक्ट्रिकल विभागात काम करतात ते सांगतात, दोन वर्षांपासून कंपनीत चार ते पाच प्लॅन्ट सुरु करण्यात आले आहेत. या वर्षात ६६ कोटींच प्रॉडक्शन झाल्याचं मॅनेजमेंट सांगतय. दहा महिन्यापासून अॅडव्हान्स म्हणून पाच हजार रुपये दिले जात आहेत. मात्र, यामध्ये काही भागत नाही. आमचे लोक इथे काम करुन दुसरीकडे पार्टटाईम काम करीत आहेत. घरातील महिला घरखर्च भागवण्यासाठी काहीतरी जोडधंदे करीत आहेत. श्रीरंग बारणेंनी संसदेत बऱ्याचदा याबाबत प्रश्न उपस्थित केला त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला १०० कोटी रुपये मिळाले. अजूनही ८७० कोटींचे पॅकेज मिळणे अपेक्षित आहे. यापुढे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी हे पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न कारावा, त्यामुळे कंपनी पू्र्ण क्षमतेने चालू होऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मनिषा शेलार यांचे पती एचएमध्ये काम करतात. त्यांच्या पतीला सध्या पाच हजार रुपये कंपनीकडून मिळतात. त्या म्हणतात, आम्हाला यामुळे खूपच अडचणी येत आहेत. घरखर्च भागत नाही. त्यासाठी मी पापड व्यवसायही सुरु केला आहे. आमच्यावर अशी वेळ कधी येईल असं वाटलं नव्हतं. या लोकसभा निवडणूकीत जो कोणी निवडून येईल त्यांनी कंपनी पुन्हा सुरळीत सुरु व्हावी यासाठी प्रयत्न करावेत हीच आमची माफक अपेक्षा आहे.