डोकलामच्या मुद्द्यावरुनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला. चीन बरोबर डोकलामाचा संघर्ष झाला. त्यावेळी चीनबद्दल संतापाचे वातावरण निर्माण करण्यात आले. युद्धाचा माहोल बनवण्यात आला. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका असे संदेश फिरत होते. पण रात्री यांना चायनीज लागते असे राज ठाकरे म्हणाले.

डोकलामवरुन चीन बरोबर इतका संघर्ष झाला मग सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चीनमधून कसा आला ? असा सवाल राज ठाकरेंनी केला. मोदी सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळयावर ३ ते ४ हजार कोटी खर्च केले असा आरोप राज ठाकरेंनी केला. हा देश पाणी, नोकरी, उद्योगासाठी तडफडतो आहे. पण यांना जिवंत माणसांची पडलेली नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला.

जैन मित्र बीफच्या निर्यात व्यवसायात आहेत मग इतरांना का दोष देता?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माढयातील सभेमध्ये आपली जात काढली. मागास असल्यामुळे आतापर्यंत संकटे आणि अडचणी आपणास सहन कराव्या लागल्या असे मोदी म्हणाले होते. त्याच मुद्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या पुण्याच्या जाहीर सभेमध्ये समाचार घेतला.

मागच्या पाच वर्षात देशात दलित बांधवांवर अत्याचार झाले त्याबद्दल मोदी तुम्ही का बोलला नाहीत ?. त्यावेळी मागास जात का नाही आणलीत? गुजरातमध्ये मृत जनावरांची कातडी काढणाऱ्यांना गोरक्षकांनी मारलं. त्यांनी गाय मारली नव्हती. तरीही त्यांच्यावर आरोप करुन मारहाण करण्यात आली. मोदींचे स्वत:चे जैन मित्र बीफ व्यवसायात आहेत. मग त्यांना का मारलतं?