अलिबाग : राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांना पेड न्यूज प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी पेड न्यूजबाबत अद्याप खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे पेड न्यूज प्रसिद्धीचा खर्च पार्थ याच्या निवडणूक खर्चात लावला जाणार असल्याचे संकेत निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पनवेल यांनी नोटीस बजावली आहे. अलिबागच्या मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने दिलेल्या अहवालानुसार पार्थ पवार यांच्या प्रचारासंदर्भात दैनिक कर्नाळामध्ये २२ आणि २३ मार्च रोजी तर २५ मार्च रोजी किल्ले रायगड, रायगड नगरी आणि दैनिक पुढारी या तीन वृत्तपत्रांत एकसारख्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

या बातम्या पेड न्यूज संवर्गात मोडत असल्याचा निष्कर्ष अलिबाग येथील मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने काढला आहे. त्यामुळे या बातम्यांच्या प्रसिद्धीचा खर्च पार्थ पवार यांच्या निवडणूक खर्चात का समाविष्ट केला जाऊ नये, अशी विचारणा या नोटिसीत करण्यात आली आहे.

पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यांवतीने अद्याप या नोटिसीला कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रसिद्धीचा खर्च पार्थ यांच्या निवडणूक खर्चात लावला जाणार असल्याचे संकेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय अलिबाग यांनी दिले आहेत.