देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट होताच जगातल्या विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा संदेश येण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील पंतप्रधान नरेद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी मिळवलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदीचं अभिनंदन असं ट्विट त्यांनी केलं आहे.

इम्रान खान यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी मिळवलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदीचं अभिनंदन. दक्षिण आशियात शांतता, विकास आणि भरभराटीसाठी त्यांच्यासोबत एकत्र काम करायला मिळेल अशी अपेक्षा’.

सर्वप्रथम श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे अभिनंदन. तुमच्यासोबत काम करु असे विक्रमसिंघे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

मोदींचे जवळचे मित्र समजले जाणारे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सुद्धा मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-इस्त्रायल मैत्रीसंबंध अधिक भक्कम करण्यासाठी काम करु असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी फोनवरुन मोदींशी चर्चा करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुद्धा टेलिग्राम संदेशाद्वारे मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.