पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य होईल. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. इम्रान यांच्या याच वक्तव्यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

इम्रान खान यांनी दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर केजरीवाल यांनी ट्विटवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या ट्विटमध्ये केजरीवाल म्हणतात, ‘पकिस्तानला मोदींना का जिंकवायचे आहे? मोदींनी देशाला सांगायला हवे की, पाकिस्तानबरोबर त्यांचे नाते किती दृढ आहे? सर्व भारतीयांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मोदी जिंकले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील.’

इम्रान यांच्या वक्तव्याबरोबरच केजरीवाल यांनी राफेल प्रकरणात न्यायलयाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयावरही ट्विट केले आहे. ‘मोदी सगळीकडे मला सर्वोच्च न्यायालयाकडून क्लिन चीट मिळाल्याचे सांगत फिरत आहेत. आजच्या न्यायलयाच्या निर्णयानंतर हे सिद्ध झाले आहे की मोदींनी राफेल प्रकरणात चोरी केली आहे. देशाच्या लष्कराला त्यांनी धोका दिला आहे. तसेच आपला हा गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती दिली आहे,’ असा आरोप केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.

लोकसभेत केजरीवाल काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी इच्छूक आहे. आप आणि काँग्रेसदरम्यान याच संदर्भात अनेक बैठकी झाल्या असून यासंदर्भात कोणताही अंतीम निर्णय मात्र झालेला नाही.