वसई : बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या वसई-विरार शहरामध्ये गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी शुकशुकाटच होता. पराभव दिसताच पक्षाचे सर्व नेते ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असल्याचे स्पष्ट झाले. त्याच वेळी, पराभव झाला तरी मताधिक्य वाढल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष हिंतेद्र ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले.

पालघर लोकसभा मतदारसंघातील वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार आहे. वसई, नालासोपारा आणि विरार  पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. ‘बविआ’च्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री असल्याने जल्लोषाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. सकाळी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित आणि ‘बविआ’चे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात अवघ्या काही मतांचा फरक होता. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये ‘बविआ’चा उमेदवार जिंकेल, असा विश्वास होता. मात्र गावितांचे मताधिक्य वाढू लागले आणि कार्यकर्त्यांच्या आशा संपुष्टात येऊ  लागल्या. पालघरमध्ये मतमोजणीसाठी गेलेल्या अनेकांनी काढता पाय घेतला.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे कार्यालय विरारमधील विवा महाविद्यालयात आहे. हे पक्षाचे मुख्यालय आहे. तिथे दिवसभर शुकशुकाट होता. कार्यालयातही कुणी नव्हते. सर्व प्रमुख नेत्यांची कार्यालये बंद होती. पक्षाच्या अनेक नेत्यांचे मोबाइल बंद होते. हे नेते बाहेर न पडता मतमोजणीची माहिती घेत होते.

‘मताधिक्य वाढल्याचे समाधान’

या निवडणुकीत आम्ही प्रयत्न केला, मात्र यश मिळाले नाही. ही देशाची निवडणूक होती, लोकांनी मोदींकडे पाहून मतदान केले अशी प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली. आमचे मताधिक्य वाढल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मागील पोटनिवडणुकीत ९ लाख ९२ हजार मतदान झाले होते. आता १२ लाखांहून अधिक मतदान झाले आहे. आमची मते २ लाख ५६ हजारांनी वाढली आहे तर शिवसेना भाजपच्या मतांमध्ये केवळ ३० हजारांची वाढ झाल्याचे ते म्हणाले. पक्षाचे कार्यकर्ते राजीव पाटील यांनीदेखील ही मोदींच्या करिष्म्यामुळेही शिवसेनेचा विजय झाल्याचे सांगितले. पक्षाची रिक्षा निशाणी गेली होती. त्याचा फटका बसल्याचे सांगितले. आमची शिटी निशाणी असती तर ३० ते ३५ हजार मते निश्चितच जास्त मिळाली असती असेही ते म्हणाले.

भाजप-शिवसेनेची शहरात रॅली

वसई-विरार या बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात कार्यकर्त्यांचा शुकशुकाट असताना शिवसेना-भाजपने जल्लोष केला. आगरी सेनेने विरारमध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त केला तर वसईत भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचा जयजयकार करत रॅली काढली. वसईतील भाजप कार्यालयाला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. संध्याकाळी शहरात भाजप-शिवसेनेतर्फे विजयी रॅली काढण्यात आल्या.