15 October 2019

News Flash

आघाडीची नाराजी ‘बविआ’ला भोवली

बविआ’ला सहयोगी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाराजी भोवल्याचे समोर आले आहे.

निकालानंतर ‘बविआ’चे कार्यालय कार्यकर्त्यांअभावी सुने झाले.

काँग्रेस, राष्ट्रवादीला विश्वासात न घेतल्याचा परिणाम

वसई : पालघर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचा घटकपक्ष असलेल्या ‘बविआ’ला सहयोगी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाराजी भोवल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेणे, कुठलेही ठोस आश्वासन न देणे, या कारणांमुळे  ‘बविआ’ला काँग्रेसची साथ मिळाली नसल्याचे दिसून आले आहे.

शिवसेना-भाजप महायुतीच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाआघाडी स्थापन केली होती. या महाआघाडीतर्फे पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला जागा सोडण्यात आली होती. हा मतदारसंघ राखीव असल्याने माजी खासदार बळीराम जाधव यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र सुरुवातीपासून पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याची तक्रार काँग्रेसकडून केली जात होती.

मला मतदान होईपर्यंत पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी एक दूरध्वनी केला नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव विजय पाटील यांनी सांगितले. काँग्रसने बविआला साथ दिली मात्र आम्हाला त्यांनी विधानसभा, महापालिका वा जिल्हा परिषद यासाठी कुठलेच आश्वासन दिले नाही. मग एकतर्फी आघाडी कशी होऊ  शकते, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांकडेही ‘बविआ’च्या नेतृत्वाने लक्ष दिले नाही, स्थानिक काँग्रेसला विश्वासात घेतले नाही, त्यामुळे त्यांना फटका बसला, असे ते म्हणाले. प्रचारादरम्यान डहाणूत पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर सहयोगी पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा जाहीर अपमान केला होता, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

‘भाजपने प्रचंड पैसा ओतला’

वसईत काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. संपूर्ण मतदारसंघात ‘नोटा’ पर्यायाचा सर्वाधिक वापर झाला आहे. बविआ काँग्रेसच्या घटकपक्षाचा भाग असली तरी त्यांची नाराजी ‘नोटा’तून व्यक्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची वसईत ताकद नाही. त्यांच्या स्थानिक नेत्यांनी प्रचार केला. मात्र लोकांनी मोदींसाठी मतदान केले आणि भाजपाने प्रचंड पैसा ओतल्याने पराभव झाल्याचे राष्ट्रवादीचे वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी सांगितले.

First Published on May 24, 2019 3:35 am

Web Title: palghar election results 2019 lok sabha election 2019 bahujan vikas aghadi