राज्यभरात महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराला मी जात असून प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मुलाच्या प्रेमापोटी अजित पवार अजूनही मावळमध्ये आहेत. त्यामुळे राज्यातील आघाडीच्या उमेदवारांची काय अवस्था झाली आहे अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या कात्रज येथील सभेला उपस्थित होत्या. यावेळी आमदार योगेश टिळेकर,नगरसेविका संगीता ठोसर तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. याकडे कोणी ही लक्ष देऊ नका असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

राहुल गांधींना देवाने १०० वर्षाचे आयुष्य देवो : पंकजा मुंडे
देशाच्या सीमेवर पाकिस्तानकडून हल्ला झाल्यावर त्यांच्याच हद्दीमध्ये जाऊन एअर स्ट्राईक करीत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर विरोधकांकडून त्या बाबतचे पुरावे मागितले गेले. पुरावे मागणार्‍यामध्ये राहुल गांधी हे देखील होते. आता पुरावे मागणार्‍यांना विमानाच्यापुढे बांधयाचे होता का असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. पण कोणालाही इजा होता कामा नये. मात्र मी देवाकडे एक प्रार्थना करते की राहुल गांधी यांना शंभर वर्ष आयुष्य मिळो.