20 October 2019

News Flash

आधी धरण, मग बटण! पाण्यासाठी बापकळच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

गावात विकासकामे नाही. रोजगारही नाही. त्यामुळे तरुणांची लग्न ठरत नाही, अशी व्यथाही ग्रामस्थांनी सांगितले.

नामदेव कुंभार, परभणी

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदानात परभणी मतदारसंघातील बापकळ या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गावात पाण्याची सुविधा नाही, शाळा नाही, रस्त्यांचा विकास नाही… अशा समस्यांनी ग्रासलेल्या या ग्रामस्थांनी आधी धरण, मग बटण अशी भूमिका घेत मतदानावर बहिष्कार टाकला. मत घेण्यासाठी ताई, अक्का म्हणतं सगळे येतात, पण मत मिळाल्यावर कोणीही ढुंकून बघत नाही, अशा शब्दात गावातील महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

परभणी मतदार संघात बापकळ या गावाचा समावेश होतो. हे गाव हिंगोली जिल्ह्यात असले तरी त्याचा समावेश परभणी मतदारसंघात होतो. या गावातील परिस्थिती अत्यंत भीषण आहे. या गावात सुमारे ७०० मतदार आहेत. या मतदारांनी बुधवारी मतदानावर बहिष्कार टाकला. गावात कामधंदा नाही, शाळा नाही, शेतीसाठी पाणी, आम्ही कसे जगायचे, आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आली आहे, अशी कैफियत गावातील महिलेने मांडली. आमच्या तरुण मुलांना रोजगारासाठी मुंबईत जावं लागतंय, आमच्या समस्यांकडे कोणी का बघत नाही, दोन – दोन किलोमीटरवरुन पाणी आणावे लागते, आता मी माझं लेकरु विकू का, असा संतप्त सवाल गावातील महिलेने विचारला.

गावातील शरद सावंत हा तरुण सांगतो, गावात विकासकामे नाही. रोजगारही नाही. त्यामुळे तरुणांची लग्न ठरत नाही. जमीन सिंचन प्रकल्पासाठी जाणार असल्याने गावातील तरुणांना मुलगी देण्यास कोणीही तयार होत नाही. मी तीन ते चार स्थळ बघितले, पण त्यांनी गावाची अवस्था पाहून लग्नास नकार दिला, असे शरदने सांगितले.

गावातील सरपंच श्रीकांत घुले- पाटील यांनी ग्रामस्थांची नेमकी भूमिका काय, याची माहिती दिली. ते म्हणतात, गावात २००८ साली हातवण सिंचन प्रकल्प मंजूर झाला आहे. मात्र, अजूनही प्रकल्प मार्गी लागलेला नाही. प्रकल्प मंजूर झाल्याने गावात विकासकाम होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे जगणे अवघड झाले. गावात पाणीदार शिवारसाठी कामे मंजूर होत नाही. त्यामुळे १२ वर्षांपासून ग्रामस्थांचे जीवन ठप्प झाले आहे. गोदावरीच्या पाण्यासाठी नेते हायकोर्टात जातात. पण जालन्यात दोन टीएमसी पाणी असूनही अडवले जात नाही ही शोकांतिका आहे आणि यासाठीच आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पिण्यासाठी, जनावरांसाठी पाणी उपलब्ध नाही आणि चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करतोय. प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत आहेत, यामुळेच आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला, असे त्यांनी सांगितले.

First Published on April 18, 2019 5:04 pm

Web Title: parbhani villagers ban voting protest raises water issue