अमित उजागरे/कृष्णा पांचाळ

मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे भागातील तरुणांनी यंदा तरुण उमेदवार पार्थ पवार यांना संधी देण्यास हरकत नाही अशी भावना व्यक्त केली आहे. तर शेतकरी ग्रामस्थांनी बारणेंच्या कामांवर आणि केंद्र शासनाच्या योजनांवर समाधानी असल्याचे म्हटले आहे. लोकसत्ता डॉटकॉमने या भागातील जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ग्रामस्थांनी हे मत व्यक्त केलं.

तळेगाव नगरपालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या आकाशने रोजगाराच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, नव्या नोकऱ्या निर्माण होताना दिसत नाहीत त्यामुळे तरुण त्रस्त आहेत. माझं स्वतः बीसीएसपर्यंतच शिक्षण झालंय पण या शिक्षणासंबंधी काम मिळत नाहीए त्यामुळे मला नगरपालिकेत तुटपुंज्या पगारावर कंत्राटीपद्धतीने काम करण्याची वेळ आलीय. ग्रामीण भागात सध्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. बऱ्याच ठिकाणी कामं सुरु आहेत पण या कामांना गती नाही. विद्यमान खासदार बारणेंचा या भागात संपर्क नाही. त्यामुळे पार्थ पवार हे तरुण असल्याने आमचे प्रश्न समजून घेतील अशी अपेक्षा आहे.

योगेश आंद्रे या तरुणानं सांगितलं की, तळेगावात लोकल रेल्वेचा मोठा प्रश्न आहे. इथं गाड्या खूपच उशीराने धावतात. त्यामुळे पुणे शहरात जाण्यासाठी त्यांना बराच वेळ वाट पहावी लागते. गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात किंवा ज्या लोकल तासा दीडतासानं येतात त्यांच्यातील वेळा अर्धातासापर्यंत कमी करावा. इथं रेल्वेचा तिसरा ट्रॅक वाढवण्यापेक्षा गाड्यांच्या संख्येत वाढ करावी. घरोडी स्टेशनजवळच्या कचरा डेपोचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. एकूणच पवार कुटुंबाच्या विकासाच्या राजकारणामुळं इथं पार्थ पवारांकडून जनतेला अपेक्षा आहेत. नव्या नोकऱ्यांच्या निर्मितीकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष द्वाये एवढीच अपेक्षा आहे.

तळेगाव दाभाडे येथील बस स्थानकावर रसवंती गृह चालवणारे बालाजी कोकरे म्हणाले, इथल्या तरुणांना परिवर्तन हवं आहे. नोटाबंदीमुळे आम्हाला त्रास झालाय. बारणे पाच वर्षात इथं दिसलेच नाहीत, ते फक्त टीव्हीवरच दिसतात. एकदा पार्थ पवारांना संधी द्यावी अशी आम्हा मित्रांमध्ये चर्चा आहे. देशात एकहाती सत्ता देऊन उपयोग झालेला नाही उलट गरीबांचे खूपच हाल झालेले आहेत. मार्केटमध्ये सध्या मंदीचं वातावरण आहे. महागाई पण वाढलेली आहे. त्यामुळे भाजपाला एकहाती सत्ता देऊनही काहीही उपयोग झालेला नाही.

निगडे गावचे ग्रामस्थ चंद्रकांत शिवेकर सांगतात, आमच्याकडं बारणेंची चर्चा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केले आहेत. मावळच्या ग्रामीण भागात रस्त्यांचे काही प्रश्न आजही शिल्लक आहेत. आमच्या भागात एमआयडीसी येऊ नये या आमच्या मागणीकडे नव्या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे. एमआयडीसी आल्यास इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. इथं एमआयडीसी येऊन रोजगार निर्माण होणार नाही. कारण नवलाख उंब्रज मध्ये एमआयडीसी असून उपयोग नाही, स्थानिकांना तिथं रोजगार नाही सर्व बाहेरचीच लोकं काम करीत आहेत. केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सोसायट्यांचे कर्ज माफ झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार लागायला हवं. निगडे गावचेच ग्रामस्थ शत्रुघ्न साळवे म्हणाले, मावळ भागात कोण निवडणून येईल हे लोकमतावर अवलंबून आहे. मात्र, देशात पुन्हा मोदी सरकार यावं असं प्रामाणिकपणे वाटतं.