20 October 2019

News Flash

मतदानासाठी पाटील दाम्पत्य जर्मनीहून थेट अलिबागला

लोकसभा निवडणुकीसाठी हे दाम्पत्य जर्मनीतील स्टुटगार्ड येथून थेट शहाबाज येथे दाखल झाले.

सुबोध पाटील आणि प्राची पाटील हे कामानिमित्ताने जर्मनी येथे वास्तव्य करत आहेत.

हर्षद कशाळकर, अलिबाग

मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. तो सर्वाचा हक्कही आहे. याचाच एक प्रत्यय अलिबाग तालुक्यातील शहाबाजकरांना आला. शहाबाज येथील सुबोध पाटील आणि प्राची पाटील हे कामानिमित्ताने जर्मनी येथे वास्तव्य करत आहेत.

पण लोकसभा निवडणुकीसाठी हे दाम्पत्य जर्मनीतील स्टुटगार्ड येथून थेट शहाबाज येथे दाखल झाले. एवढेच नव्हे तर या दाम्पत्याने आपला मतदानाचा हक्कही बजावला.

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या स्वॅप अर्थात सिस्टीमॅटिक वोटर एज्यूकेशन अ‍ॅण्ड इलेक्ट्रोरल पार्टिसिपेशन या उपक्रमाअंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय निवडणूक आयोगाने या मतदार जागृती अभियानाला सुरुवात केली आहे. प्रगल्भ लोकशाही निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेणे हा या मागचा उद्देश आहे. या जनजागृतीचे काही सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले आहेत.

रायगड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने याचा प्रत्यय आला. निवडणुकीचा टक्का वाढवण्यात प्रशासनाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी सुबोध पाटील आणि प्राची पाटील यांनी थेट जर्मनीहून शहाबाज गाठून मतदान करत इतरासाठी आदर्श घालून दिला आहे.

मतदान हा प्रत्येकाचा हक्क आहे. तो बजावणे सर्वाचे कर्तव्यही आहे. दर वर्षी आम्ही सुट्टीत भारतात परत येत असतो.

या वर्षी मात्र लोकसभा निवडणुकीनुसार आम्ही आमच्या सुट्टीचे नियोजन केले आणि मतदानाचा हक्कही बजावला, याचे एक विलक्षण समाधान आम्हाला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

First Published on April 25, 2019 2:50 am

Web Title: patil couple reached alibaug directly from germany for the voting