सहा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत जाण्याची परवानगी हवी

नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची उद्या गुरुवारी मतमोजणी होणार असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बाकाप्रमाणे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बाकापर्यंतही उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात यावा, अशी विनंती कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकेद्वारा केली आहे. या विनंतीवर निवडणूक आयोगाने सहनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे स्वतंत्र बाक नसून ते केवळ पर्यवेक्षणाचे काम करतील, अशी माहिती दिली. अवकाशकालीन न्या. पुष्पा गनेडीवाला यांनी सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून प्रकरण गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्णयासाठी ठेवले आहे.

मतमोजणीवेळी उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर उपस्थित असतात. त्यामुळे मतमोजणी करताना उमेदवाराच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बाकापर्यंत जाता येते. पण, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीच बरेच काम सांभाळतात. त्यामुळे त्यांच्या बाकापर्यंत उमेदवाराच्या

प्रतिनिधींना प्रवेश मिळावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने निवडणूक आयोगालाही पत्र लिहिले. निवडणूक आयोगाने उत्तर न दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रावर कॉंग्रेसच्या १२४ प्रतिनिधींना प्रवेश मंजूर केला आहे. पण, त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बाकापर्यंत जाण्याची परवानगी नाही.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी सहा भागात होणार आहे. त्यासाठी १२० बाके लावण्यात आली आहेत. तीन बाके टपाली मते मोजणीसाठी आहेत तर सहा बाके हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी आहेत. नाना पटोले यांच्यावतीने अ‍ॅड. रफिक अकबानी आणि राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता यांनी बाजू मांडली.