सर्वोच्च न्यायालयाकडून सुश्मिता देव यांना स्वतंत्र याचिकेस मुभा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारी काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.

सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांनी सांगितले की, मोदी व शहा यांनी आचारसंहिता उल्लंघन केल्याच्या तक्रारी फेटाळण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशांवर नवी याचिका सादर करण्याची देव यांना मुभा देण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सिलचरच्या खासदार असलेल्या सुश्मिता देव यांना असे सांगितले होते की, निवडणूक आयोगाने भाजप नेत्यांना आचारसंहिता  भंगाच्या तक्रारीत निर्दोषत्व बहाल केल्याच्या आदेशांच्या प्रती न्यायालयाला सादर कराव्यात. न्यायालयाने सांगितले की, निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारींबाबत योग्य-अयोग्य निवाडा केला आहे. वरिष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडताना सांगतिले की, आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी देणाऱ्यांनी आयोगाच्या आदेशांवर हरकत घेतलेली नाही. देव यांची  बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने मोदी व शहा यांच्या विरोधातील तक्रारी कुठलीही तर्कशुद्धता न दाखवता फेटाळल्या आहेत.  देव यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात असा दावा केला की, पंतप्रधान मोदी व शहा यांची भाषणे द्वेषमूलक व दोन धर्माच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करणारी होती. निवडणूक आयोगाने तक्रारी  फेटाळताना कुठलेही कारण दिलेले नाही.