पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या बॉक्सरप्रमाणे २०१४ मध्ये राजकारणाच्या रिंगणात उतरले. रिंगणात उतरताच त्यांनी पहिला ठोसा त्यांचे कोच लालकृष्ण आडवाणींनाच लगावला अशी खोचक टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हरयाणा येथील भिवानी या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा होती त्याच सभेत त्यांनी ही खोचक टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५६ इंची छाती असलेले बॉक्सर आहेत असं जनतेला आणि कोच आडवाणी यांना वाटलं होतं. ते बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या या प्रतिस्पर्ध्याशी लढतील असं वाटलं होतं. मात्र कुणाशी लढायचं आहे हे मोदी विसरून गेले असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटले राहुल गांधी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका बॉक्सरप्रमाणे तयार करून २०१४ मध्ये राजकारणाच्या रिंगणात उतरवण्यात आलं. या रिंगणात उतरून नरेंद्र मोदी बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, भ्रष्टाचार या आणि इतर समस्या घेऊन उभ्या असलेल्या प्रतिस्पर्ध्याशी लढतील असं जनतेला आणि आडवाणी, गडकरी, जेटली यांना वाटलं होतं. मात्र मोदींनी पहिला ठोसा लगावला तो आडवाणींनाच. त्यानंतर ते गडकरी आणि जेटली यांच्या मागे धावले. त्यांनाही धाड धाड ठोसे लगावले. रिंगण सोडून आपले बॉक्सर नरेंद्र मोदी कुठे जात आहेत हा प्रश्न जनतेला पडला. मग जनतेने विचारले तुम्ही बेरोजगारी दूर करणार होतात त्याचे काय झाले? त्यावर जनतेलाही मोदींनी ठोसा लगावला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी विचारलं आमचं काय? त्यावर मोदींनी त्यांना जीएसटी आणि नोटाबंदी हे दोन ठोसे लगावले अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू आहे. आज निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडला. एकीकडे मोदींनी आपली रणनीती आखत आता विरोधकांचा पराभव किती मोठा होणार हेच पहाणे बाकी राहिल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी मोदींना बॉक्सर म्हणत, कुणाशी लढायचं आहे हेच मोदी विसरल्याची खोचक टीका केली. आता या टीकेला मोदींकडून किंवा भाजपाकडून कसं उत्तर दिलं जाणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.