पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकारण संपुष्टात आले असून आता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मोदींची साथ सोडली आहे. मोदींनी आश्वासनांची पूर्तता न केल्याने जनतेत नाराजी आहे. आता संघाचे स्वयंसेवकही प्रचारात सहभागी होत नसून यामुळे मोदी हवालदील झाले आहेत, अशी घणाघाती टीका बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे.

मायावती यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेत मोदींवर निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात रोड शो आणि धार्मिक स्थळांवर जाऊन प्रार्थना करणे ही फॅशन झाली आहे. यावर पैशे खर्च केले जातात. निवडणूक आयोगाने या खर्चाचा समावेशही उमेदवाराच्या खर्चात केला पाहिजे, अशी मागणी मायावती यांनी केली.

जर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने एखाद्या उमेदवार किंवा नेत्याच्या भाषणांवर बंदी घातली असेल आणि संबंधित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहत असेल किंवा प्रार्थना करत असेल तर अशा प्रकारांवर बंदी घातली पाहिजे. निवडणूक आयोगाने अशा प्रकरणांमध्ये कारवाई केली पाहिजे, असे मायावतींनी सांगितले. मोदी सरकारचे जहाज बुडत असल्याने संघानेही त्यांची साथ सोडली आहे, असे मायावती म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सोमवारी गोरखपूरमधील एका सभेतही मायावतींनी मोदींवर टीका केली होती. शिव्या खायची कामं केली तर शिव्या पडणारच, असे मायावतींनी म्हटले होते. आपल्या पत्नीला राजकारणासाठी ज्यांनी सोडले ते इतर महिलांचा सन्मान कसा करणार? अशा शब्दांत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला होता.