लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. २३ मे रोजी निकालानंतर एक्झिट पोल प्रमाणे परिस्थिती कायम राहिली तर काय संभाव्य पावले उचलावी याबाबत दोघांच्या भेटीत चर्चा होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदी नागपूर येथील संघ मुख्यालयात जाऊन भागवत यांची भेट घेतील. यावेळी विविध मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते. २३ मे रोजीच्या निकालांपूर्वी होणाऱ्या दोघांच्या या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या चार वर्षात मोदींचा संघाच्या मुख्यालयावरचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

दरम्यान, जर एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर संघाकडून पंतप्रधानपदासाठी मोदींच्या जागी दुसऱ्या नेत्याच्या नावाचा प्रस्ताव येऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे मोदींची ही भेट संघ प्रमुखांचे मन वळवण्याचा प्रयत्न आणि पंतप्रधानपदासाठी आपल्याच नावाला पाठींबा मिळावा यासाठी असू शकते असेही बोलले जात आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून मोदी संघाच्या मुख्यालयापासून दूर होते. अमर उजालाने याबाबत वृत्त दिले आहे.

नागपूरमधील भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, भाजपा पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येईल अशी आम्हाला आशा आहे. मात्र, बहुमत जर मिळाले नाही तर संघाकडून मोदींना बाजूला सारले जाऊ शकते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट झालीच तर सरकारसहित अनेक मुद्द्यावर चर्चा होऊ शकते.