शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी देण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केले आहे. “जगात गेल्या 5 हजार वर्षांपासून ज्या महान संस्कृती आणि परंपरेने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा संदेश दिला. ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ हा संदेश दिला. ज्या संस्कृतीने ‘एकम् सद् विप्रा: बहुधा वदन्ति’ चा संदेश दिला. त्या संस्कृतीला तुम्ही (काँग्रेस नेते) दहशतवाद ठरवून मोकळे झालात. या सर्वांना उत्तर देण्यासाठी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देणे हे एक प्रतिक असून काँग्रेसला हे आरोप महागात पडणार आहेत”, असे मोदींनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे माझ्याच शापामुळे दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे धक्कादायक विधान मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळमधील उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एका सभेत केले आणि वाद निर्माण झाला. प्रज्ञासिंह यांच्या या विधानावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. अखेर प्रज्ञासिंह यांनी माफी मागत विधान मागे घेतले होते. प्रज्ञासिंह यांना भाजपाने उमेदवारी का दिली, असा प्रश्नही विरोधक विचारत होते.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटाप्रकरणी निकाल आला आहे. काय झालं त्यात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यावेळी त्यांच्या मुलाने म्हटले होते की जेव्हा मोठे झाड पडते त्यावेळी जमीनही हादरते. यानंतर देशभरात शीखांवर हल्ले सुरु झाले. हा दहशतवाद नव्हता का?, यानंतर त्याच व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवण्यात आले, त्यावेळी माध्यमांनी प्रश्न उपस्थित केले नाही, असे मोदींनी म्हटले आहे.  अमेठी आणि रायबरेली येथील उमेदवार जामिनावर आहेत, पण त्यांची चर्चा होत नाही. पण भोपाळमधील उमेदवार जामिनावर बाहेर असतील त्यावरुन वाद निर्माण केला जातो, असा आरोपही मोदींनी केला.

मोदी पुढे म्हणतात, अनेक शीखांना जाळण्यात आले आणि या घटनांचे साक्षीदारही आहेत. मात्र या शीखविरोधी दंगलीतील आरोपींना खासदारकी देण्यात आली आणि यातील एकाला तर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले. ज्या लोकांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, त्यांना लोक तुरुंगात जाऊन भेटता. रुग्णालयात जाऊन भेटतात. अशा लोकांना तत्वांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे मोदींनी सांगितले.