पंतप्रधानांच्या सभेच्या पाश्र्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेला चिंता; चर्चेद्वारे तोडगा काढण्याची धडपड

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी पिंपळगाव येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या वेळी कोणत्याही आंदोलनाला तोंड द्यावे लागू नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा अक्षरश: कामाला लागली आहे. ज्या घटकांनी आंदोलनाचे इशारे दिले किंवा जे घटक आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याची शक्यता आहे, अशा सर्वाशी आधीच चर्चा करून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर महाराष्ट्रात पंतप्रधानांची पहिलीच जाहीर सभा पिंपळगाव येथे होत आहे. सभेसाठी भाजप, शिवसेनेच्या स्थानिक संयोजकांनी अनेक जागांची पाहणी करून पिंपळगाव येथील २०० एकर क्षेत्राचे मोकळे मैदान निश्चित केले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याचा कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणाही तयारीला लागल्या आहेत. या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तयारीचा आढावा घेण्यात आला. मंगळवारी जिल्हा आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी सभेच्या जागेची पाहणी करत ती योग्य असल्याचा निर्वाळा दिला.

ज्या भागात सभा होत आहे, तो कांदा, द्राक्षासह कृषिमाल उत्पादन करणारा परिसर आहे. कांद्याला भाव नसल्याने परिसरात काही वर्षांत अनेक आंदोलने झाली आहेत. टोमॅटो, द्राक्ष आदींच्या दरावरूनही ग्रामीण भागातील अस्वस्थता अधूनमधून अधोरेखीत होत असते. शरद पवार कृषिमंत्री असताना एका सभेत कांदा भिरकावण्याचे प्रकार घडले होते. अलीकडेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यावेळी महामार्गावर कांदा ओतण्यात आला होता. कृषिमालास भाव मिळावे, यासाठी तीन वर्षांपूर्वी सलग काही दिवस बंद पाळून शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. हा इतिहास लक्षात घेऊन प्रशासन पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी आंदोलन होऊ नये, याची खबरदारी घेत आहे.

सभेच्या निमित्ताने काही घटक आपल्या मागण्यांसाठी पुढे येण्याची शक्यता असल्यामुळे त्या मागण्यांशी ज्या शासकीय विभागाचा संबंध येतो, त्यांनी तातडीने चर्चा करून ते विषय मार्गी लावण्याची सूचना खुद्द जिल्हा प्रशासनाने केली आहे. या माध्यमातून आंदोलन किंवा तत्सम काही घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पंतप्रधानांच्या सभेत काळ्या कपडय़ांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. अहमदनगर येथील सभेत काळे कपडे परिधान करणाऱ्यांना प्रवेश नाकारला गेला होता. त्याची पुनरावृत्ती नाशिकच्या सभेत होऊ शकते. या संदर्भात पोलीस यंत्रणा आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

सर्पमित्र.. हा तर खोडसाळपणा

पिंपळगाव येथील मोकळ्या मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. त्या ठिकाणी साप, विंचूची धास्ती असल्याने सर्पमित्र तैनात केले जाणार असल्याच्या चर्चेला जिल्हा प्रशासनाने खोडसाळपणा म्हटले आहे. मोकळ्या मैदानावर साप, विंचूचा साधारणपणे कुठेही संचार असू शकतो. त्यासाठी प्रशासन सर्पमित्र तैनात करणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निवृत्ती वेतनधारक, कामगारांचा इशारा

जिल्हा ईपीएफ निवृत्तिवेतनधारक फेडरेशनने पंतप्रधानांच्या सभेत फलक हाती घेऊन शांततेच्या मार्गाने जाब विचारण्याचा इशारा दिला आहे. सभास्थळी ईपीएफ ९५ निवृत्तिवेतनधारक, निवृत्त साखर कामगार, वीज कामगार, एसटी, एचएएल आदी आस्थापनातील निवृत्तिवेतनधारक गांधीगिरीच्या मार्गाने फलक घेऊन तसेच टोप्या घालून आंदोलन करणार असल्याचे फेडरेशनने जाहीर केले आहे.