मालेगावमधील २००८ च्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी जाहीर केल्याने वाद निर्माण झाला असतानाच आता या मुद्द्यावरुन एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदींना जर खरंच दहशतवादाविरोधात लढा द्यायचा असता तर त्यांनी साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारीच दिली नसती, अशी टीका त्यांनी केली आहे.

गुरुवारी ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी प्रज्ञा साध्वी यांच्या उमेदवारीवरुन भाजपावर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे बोलणाऱ्यांचे राजा आहेत. त्यांच्या इतका खोटारडा माणूस मी बघितला नाही. त्यांना दहशतवादाविरोधात लढा द्यायचा नाही. जर तुम्हाला खरंच दहशतवादाविरोधात लढा द्यायचा होता आणि तुमची ही प्रामाणिक इच्छा होती, तर तुम्ही दहशतवादाचे आरोप असलेल्या व्यक्तीला उमेदवारीच दिली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.

औरंगाबादमधील मतदारांनी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसू देणार नाही, अशी शपथ घ्यावी, असेही ओवेसी यांनी सांगितले. २०१४ मध्ये देशातील जनतेला खोटी आश्वासन दिली. अच्छे दिन आएंगे, असे मोदींनी सांगितले. पण अच्छे दिन आलेच नाही, ही फक्त जुमलेबाजी असल्याचे आता स्पष्ट झाले. देशातील ५० टक्के जनता तरुण आहे. आज तरुण हताश आहे. तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या आहे. पण याबाबत मोदी काहीच बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली.

महात्मा गांधी यांची हत्या करणारा माझा मेहुणा होता का, शिखांची हत्या करणारे माझे नातेवाईक होते का, असा सवाल त्यांनी मोदी आणि काँग्रेसला विचारला आहे. प्रज्ञा सिंह यांच्यावर दहशतवादाचा आरोप आहे. मग त्यांना उमेदवारी का दिली. तुम्हाला दुसरा उमेदवार सापडला नाही का, असा सवालही त्यांनी विचारला. पाकिस्तान दहशतवाद पसरवत आहे. पण मोदीजी तुम्ही प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देऊन नेमके काय साध्य करत आहात, असा प्रश्न त्यांनी विचारला. दहशतवादाचा आरोप असलेल्या एखाद्या मुस्लीम तरुणाला मी तुरुंगातून बाहेर काढले आणि त्याला मंचावर आणून त्याच्यासोबत फोटो काढला, तर देशातील प्रसारमाध्यमांनी माझ्यावर टीका केली असती. पण प्रज्ञा सिंह यांच्याबाबत कोणीही बोलत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.