पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ मे रोजी अयोध्येत प्रचारसभा घेणार असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताबाबत अद्याप भाजपाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या सभेद्वारे भाजपा हिंदू मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चाही सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीतील तीन टप्प्यातील मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा असून उत्तर प्रदेशातील जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर १ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत सभा घेणार अशी चर्चा आहे. काही वृत्तवाहिन्यांनी देखील या संदर्भात वृत्त दिले आहे. मात्र, भाजपाने यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात असले भाजपाने राम मंदिराचे काम सुरु करण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत यावे, अशी मागणी साधू- संतांनी केली होती. गेल्या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच मोदी अयोध्येत जाणार आहेत. अयोध्येत ६ मे रोजी मतदान होणार आहे.