लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण मतमोजणी होण्याआधीच जनतेचा कल भाजपच्या बाजूने लागल्याचे दिसून आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानत आपल्या ट्विटर अकाउंटवरून ‘चौकीदार’ शब्द टाकला. पंतप्रधान मोदींपाठोपाठ उत्तर भाजप पदाधिकारी आणि नेते यांनीही आपल्या ट्विटर हँडलच्या पुढे असलेला ‘चौकीदार’ हा शब्द हटवला.

याबाबत मोदी यांनी ट्विट केले. ते ट्विटमध्ये म्हणाले, “चौकीदार असल्याची भावना आता आपल्याला पुढल्या टप्प्यावर नेण्याची वेळ आली आहे. चौकीदार असल्याची प्रेरणा जिवंत ठेवून भारताच्या प्रगतीसाठी काम सुरू ठेवले पाहिजे. मी माझ्या ट्विटर हँडलवरून ‘चौकीदार’ हा शब्द जरी काढून टाकत असलो, तरी तो एक अविभाज्य घटक असेल. तुम्हालाही मी असे करण्याची विनंती करतो,’ असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

‘चौकीदार’ या शब्दाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार झाला. मी देशाचा रक्षक आहे असे म्हणणाऱ्या मोदी यांच्यावर विरोधी पक्षांनी कथित राफेल घोटाळ्यानंतर ‘चौकीदार चौर हैं’ अशी टीकेची झोड उठवली. पण पंतप्रधान मोदी यांनी आणि इतर भाजप नेते व प्रवक्ते यांनी या शब्दाचा उत्तमपणे वापर करत तो शब्द ट्विटर हँडलपुढे जोडला. यामुळे होणारी टीका काहीशी बोथट झाल्याचेही दिसून आले आणि गेले काही महिने मोदी, भाजपाचे अन्य नेते कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांनीही आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ हा शब्द जोडला होता.