भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी बंगालमधील एका सभेमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘त्यांचे हवाई दल’ पाठवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्याचे वक्तव्य शाह यांनी केले आहे. शाह यांनी भरातीय हवाई दलाचा उल्लेख मोदींचे हवाई दल असा केला आहे.

बंगालमधील एका सभेमध्ये अमित शाह राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात बोलत होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. आधी अशा हल्ल्यांनंतर काहीच कारवाई केली जात नसे. मात्र या हल्ल्यानंतर १३ व्या दिवशी पंतप्रधानांनी त्यांच्या हवाई दलाला आदेश दिले. त्यानंतर आपल्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानीमधील दहशवाद्यांच्या चिंध्या उडवल्या.’ हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन ती उद्धवस्त केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जींच्या चेहऱ्यावरील तेज गळून पडल्याची टिकाही शाह यांनी यावेळी केली. ‘ममता दीदींच्या चेहऱ्यावरील तेज त्या दिवशी उडून गेले. ममता दीदी आणि राहुल गांधींनी दहशतवाद्यांबरोबर चर्चा करण्याची मागणी केली. ममताजी तर तुम्हाला दहशतवाद्यांबरोबर लव्ह यू लव्ह यू खेळण्याची इच्छा आहे तर तुम्ही खुशाल खेळा. मात्र ही भाजपा सरकार आहे हे लक्षात ठेवा,’ असा इशारा शाह यांनी ममतांना दिला. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात म्हणजेच पाकिस्तानात घूसून खात्म करत दहशतवाद मुळापासून संपवण्याच्या निर्णय भाजपा सरकारने घेतल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.

ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष भ्रष्टाचारामध्ये सहभागी असल्याचे सांगताना शाह यांनी भाजपा सरकार सत्तेत आल्यास चीट फंड घोटाळ्यांमधील दोषींना तुरुंगात टाकू असंही या सभेत म्हटलं. ‘तृणमूलने शारदा तसेच रोज व्हॅली चीट फंड घोटाळ्यात हजारो कोटी रुपये खाल्ले. आमची सत्ता आल्यास दोषींना तुरुंगात टाकू,’ असं अणित शाह म्हणाले.

पश्चिम बंगालमधील लोकांचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याचं शाह यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिला टप्प्यात पाच जागांसाठी मतदान झाले असून १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यामध्येही राज्यातील काही जागांवर मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

याआधी योगी म्हणाले होते मोदीजी की सेना

भारतीय सुरक्षादलांना पंतप्रधानांचे दल म्हणण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराचा उल्लेख ‘मोदीजी की सेना’ असा केला होता. याप्ररकरणी निवडणूक आयोगाने योगींना नोटीस पाठवून यापुढे अशी वक्तव्ये न करण्याची ताकीद दिली होती.