पंतप्रधान मोदींचा नवा नारा; ‘एनडीए’च्या नेतेपदी एकमताने निवड

गेली पन्नास वर्षे देशातील गरीब गरीबच राहिला. त्यांच्याभोवती ‘गरिबी हटाओ’चा भ्रम निर्माण केला गेला. अल्पसंख्याकांना भीती दाखवली गेली, त्यांचा मताच्या राजकारणासाठी वापर केला गेला पण, या कपटी राजकारणाला छेद द्यायचा आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाजांना बरोबर घेऊन देशाचा विकास साधण्याचे आश्वासन दिले. गेले पाच वर्षे ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा दिला गेला होता. आता त्यात ‘सबका विश्वास’ याची भर पडली असल्याचे मोदी म्हणाले.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी ‘एनडीए’च्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत ‘एनडीए’च्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. शिरोमणी अकाली दलचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांनी हा प्रस्ताव ठेवला. त्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जनता दल (सं)चे अध्यक्ष नितीश कुमार, लोकजनशक्तीचे प्रमुख रामविलास पासवान यांन अनुमोदन दिले. मोदी सेंट्रल हॉलमध्ये येताच खासदारांनी ‘मोदी मोदी’ जयघोष केला. मोदींनी सेंट्रल हॉलमधील संविधानाला नमन केले. त्याआधी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीतही मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मांडलेल्या प्रस्तावाला नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांनी अनुमोदन दिले.

डॉ. आंबेडकरांच्या तपस्येतून निर्माण झालेल्या संविधानाच्या चौकटीत राहूनच जनसेवा करण्याचे आवाहन मोदींनी केले. महात्मा गांधी, दिनदयाळ उपाध्याय आणि राम मनोहर लोहिया या तिघांचा भारतीय राजकारणातील प्रत्येकावर प्रभाव आहे. देशातील शेवटच्या माणसाच्या भल्याचा विचार केला पाहिजे असे गांधीजी म्हणत हाच विचार घेऊन जातपात, पंथ यांच्यातील भेदभाव दूर करून देशाचा विकास करण्याचे ध्येय असल्याचेही मोदींनी भाषणात नमूद केले. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील जनमानसातील चैतन्य आणि जोश भारताला २१ व्य शतकात घेऊन जाण्यासाठी गरजेचा असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर लोकप्रतिनिधी असतानाही अत्यंत साधेपणाने राहात असत. त्याचा उल्लेख करून मोदींनी खासदारांना ‘व्हीआयपी’ संस्कृतीपासून दूर राहण्याचा ‘आदेश’ दिला.

गरिबी मुक्तीवर भर..  : भारतावर लागलेला गरिबीचा शिक्का पुसून टाकायचा आहे. त्यांनी घर, वीज, पाणी, जगण्याचे हक्क मागितले तर त्यांचे काय चुकले? त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी अव्याहत प्रयत्न करत राहिले पाहिजे. अल्पसंख्याकांना भयभीत करण्यापेक्षा त्यांना शिक्षण मिळाले असते, त्यांच्यातून सामाजिक नेते निर्माण झाले असते, त्यांचा आर्थिक-सामाजिक विकास झाला असता तर अधिक चांगले झाले असते. अल्पसंख्याक समाजालाही विश्वासात घेऊन त्यांचा विकास केला जाईल, असे मोदी म्हणाले.

२१ वे शतक भारताचे असले पाहिजे विश्वाचीही भारताकडून अपेक्षा आहे. पण, त्यासाठी देशाला समृद्ध, सशक्त, बलशाली बनवले पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वतला तयार केले पाहिजे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमुळे भाजपप्रणीत एनडीए आघाडीला थेट लोकांपर्यंत पोचण्यात यश मिळाले आहे. २०१४ चे केंद्र सरकार गरिबांसाठी चालवले गेले होते. २०१९ मधील सरकार गरिबांनी बनवले आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे.     – पंतप्रधान नरेंद्र मोदी