पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद शमला नसतानाच त्यांनी पुन्हा एकदा राजीव गांधींचं नाव घेऊन काँग्रेसवर टीका केली आहे. हिंमत असेल तर काँग्रेसने राजीव गांधींच्या नावे लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी. झारखंडमधल्या चाईबासा या ठिकाणी झालेल्या रॅलीत त्यांनी हे आव्हान दिले. देशाला पुन्हा एकदा अस्थिरता नको आहे. आपल्या देशाला एका स्थिर आणि प्रभावी सरकारची गरज आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर देशाला रिमोटवर चालणाऱ्या पंतप्रधानाची नाही तर एका सक्षम पंतप्रधानाची गरज आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव न घेता निशाणा साधला. देश भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती सत्ता देणार नाही असा विश्वास वाटतो असंही मोदींनी म्हटलं आहे. मी नामदारांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या चेल्यांना खुलं आव्हान देतो हिंमत असेल तर माजी पंतप्रधान राजीव गांधी ज्यांच्यावर बोफोर्स घोटाळ्याचा आरोप आहे त्यांच्या नावे काँग्रेसने ही निवडणूक लढवून दाखवावी.

यूपीएच्या काळात कोळसा घोटाळा कशाप्रकारे झाला त्याकडेही मोदींनी लक्ष वेधले. भारताच्या इतिहासात सर्वात मोठा कोळसा घोटाळा हा काँग्रेसच्या काळात झाला आहे असाही आरोप त्यांनी केला. काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी आपल्या देशात भ्रष्टाचार फक्त रूजवलाच नाही तर तो सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. जे कोळसा घोटाळ्यात आरोपी होते त्यांना काँग्रेसने पक्षात स्थान दिले असाही आरोप मोदींनी केला.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज पाचव्या टप्प्यासाठीचे मतदान पार पडले. यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. माजी पंतप्रधान राजीव यांच्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे मोदींवर टीका झाली. अशातच आता पुन्हा एकदा काँग्रेसला राजीव गांधी यांच्या नावे निवडणूक लढवण्याची हिंमत आहे का? असं आव्हान मोदींनी दिलं आहे. यावर काँग्रेस काय उत्तर देणार ते पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.