राज ठाकरे यांचे गुढीपाडवा मेळाव्यातले भाषण हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोच आहे. अशात कवी ना. धो. महानोर यांनी एक पत्र पाठवून राज ठाकरेंचे कौतुक केले आहे. राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्याच्या दिवशी केलेले भाषण हे अत्यंत मूलगामी आणि मुद्देसुद होते असे कवी ना. धो. महानोर यांनी म्हटले आहे.

काय आहे महानोर यांचे पत्र?

प्रिय सन्मानीय राज ठाकरे, अध्यक्ष मनसे
सप्रेम नमस्कार, फार दिवस झाले, औरंगाबादच्या विराट सभेनंतर आपल्या भेटीत आनंददायी असे बोलणे झाले होते. गुढीपाडव्याला शिवतीर्थावर आपण जे भाषण केलं ते अत्यंत अत्यंत मूलगामी आणि मुद्देसुद आणि ऐकणाऱ्यांना हलवून टाकणारं होतं. उत्स्फूर्तपणा आणि जिवंतपणा त्यामध्ये होता. देशाप्रतीची खरी कळकळ होती.
व्यंग दाखवण्याची व सडेतोड त्याची चिरफाड करण्याची आपली कला जनमान्य आहेच. आणीबाणीच्या प्रचंड अवस्थेनंतर निवडणुका आल्या. आदरणीय पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेऊन चिरफाड केली. ही महत्त्वाची ऐतिहासिक नोंद आहे. तेच आपण करत आहात. म्हणूनच आपला मित्र व एक कवी म्हणून आपलं लाख लाख अभिनंदन आणि खूप शुभेच्छा

आपला
ना. धो. महानोर
गुढीपाडवा
रात्री १० वाजता

मनसे अधिकृतचे ट्विट

राज ठाकरे हे कशाप्रकारे जनजागृती करत आहेत हे सांगणारे हे पत्र आहे. हे पत्र मनसे अधिकृत या ट्विटर अकाऊंटवर ट्विटही करण्यात आले आहे. सध्या निवडणुकांच्या काळात प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे. राज ठाकरेंनी मोदीमुक्त भारताचा नारा दिला आहे. त्यांच्या या धोरणाचा फायदा निश्चितच काँग्रेस राष्ट्रवादीला होऊ शकतो. अशात आता कवी ना. धो. महानोर यांनीही पत्र पाठवून राज ठाकरेंचे कौतुक केले आहे.