देशात नीतिमत्तेच राजकारण संपले आहे. राजकारण हा चोरांचा बाजार झाला आहे. तो चोरांचा बाजार संपवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला साथ द्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माणगाव येथे केले. ते सुमन कोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. भाकरी करपली की काढून टाकावी लागते. ती खाताही येत नाही, की तिला चवही लागत नाही. त्याचप्रमाणे आता भाजपची सत्ता उलथून टाकण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.

आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी हे डाकू आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने छापलेल्या नोटांवर गव्हर्नरची स्वाक्षरी असते. त्यावर नोटेची किंमत देण्याची हमी दिली असते. मात्र तरीही पंतप्रधान मोदी यांनी बँकेच्या गव्हर्नरच्या अधिकारात हस्तक्षेप करत नोटाबंदी करण्याचे काम केले. नंतर काळा पसा पांढरा करण्यासाठी निरनिराळ्या योजना राबविल्या. जमा होणाऱ्या पशातून ३० टक्के, ४०  टक्के रक्कम काढून घेतली, ही लूट नाही तर काय आहे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

काँग्रेस पक्ष हा भाजप चालवत आहे. त्यामुळे काँग्रेसने धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेतले नाही. राज्यातही आम्ही आघाडीसाठी तयार होतो, पण ते एमआयएमला सोबत घेण्यास तयार नव्हते. मुस्लीम मते काँग्रेसला चालतात, पण एखादा मुस्लीम नेता मोठा होत असेल तर ते काँग्रेसला चालत नाही. कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. ओवेसी हा विद्वान माणूस आहे, त्यांना बदनाम करण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून सुरू असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संबंध आहेत. त्यामुळे अनेक आरोप होऊनही तटकरे बाहेर राहिले. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करणारे शरद पवार आणि सुनील तटकरेच होते. तटकरे यांनी बोगस कंपन्या काढून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. यातील काही जमिनी सुप्रिया सुळे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनाही दिल्या आहेत.

देशात खोतीची परंपरा साली बंद झाली.  पण ७० वर्षांनंतरही कसेल त्याच्या नावावर जमिनी होऊ शकलेल्या नाहीत. खोत गेले, आता कंपन्यांच्या नावावर जमिनी खरेदी करणारे उदयास आले आहेत. प्रशासन त्यांना मदत करत आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, कसेल त्याची जमीन कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आम्ही पाठपुरावा करू. कंपन्यांच्या नावावर घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळू शकतात.

कोकणात कुणबी समाज मोठा आहे. अनंत गीते या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, पण समाजासाठी ते बोलत नाही. अनंत गीते हे मौनी खासदार आहेत. ते लोकसभेत बोलत नाहीत. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन कोळी, कोळी समाजाचे नेते रवींद्र पेरेकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक मोरे उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार २१ तारखेला संपतो आहे. मतांसाठी दोन-दोन हजार रुपये वाटले जाणार आहेत. या लोकांनी मतांचा बाजार मांडला आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, यांनी करोडो रुपये लुटले आहेत. त्यामुळे तुम्ही यांना लुटले तर काही गर नाही. पण यांचे वजन कमी करायचे असेल तर किंमतही मोठी घ्या. घरात ज्या वस्तू नसतील त्या घरात येतील असे पाहा, असा अजब सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थितांना दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.