लोकसभा निवडणुकीचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मतदार हा राजा आहे, त्यांनी दिलेला निर्णय मान्य असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बॅलेट पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरु होणं गरजेचं असून त्यासाठी विरोधकांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. विरोधी पक्षांनी ठोस भूमिका घेतल्याशिवाय बॅलेट मतदान परत सुरु होणार नाही असं ते म्हणाले आहेत.

बुहमताचा आकडा एनडीएच्या बाजूने जात असून पुढे कायम राहतो की नाही हे पाहिलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. ईव्हीएम हॅकिंगच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की, कोणत्याही यंत्राशी तुम्ही फेरफार करु शकता. घरातला ओव्हनही घरापासून दोन किमी अंतरावरुन सुरु करता येतो, तर मग ईव्हीएमदेखील हॅक होऊ शकतं. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या काळात भाजपाही ईव्हीएम मॅनेज केलं जात असल्याचं ओरडत होती असं सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविरोधात आंदोलन करण्यापेक्षा विरोधी पक्षांनी बॅलेट असेल तरच निवडणूक प्रक्रियेत भाग घेतो अन्यथा घेत नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. अशी भूमिका घेत नाही तोपर्यंत बॅलेट परत येईल असं वाटत नाही. हा न्यायालयात घेऊन जाण्याचा प्रश्न नाही, त्यामुले वारंवार न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा अर्थ नाही.

‘विरोधी पक्षांनी सांगितलं पाहिजे की, बॅलेटने मतदान होणार असेल तरच निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ. पराभव निश्चितच असेल तर निवडणूक प्रक्रियेत भाग कशासाठी घ्यायचा. बॅलेट प्रक्रिया पुन्हा परत यावी यासाठी आपण प्रयत्न करणार. किती पक्ष साथ देतील माहिती नाही. निवडणूक आयोगाकडे धाव घेणाऱ्या २२ विरोधी पक्षांनी हा पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा निवजणूक होऊ देणार नाही असं सांगितलं पाहिजे’, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

भीम आर्मीने प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाल्यास तोडफोड करु अशी धमकी दिल्यासंबंधी विचारलं असता प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, ‘मतदार हा राजा आहे, त्यांनी दिलेला निर्णय मान्य. कोणत्याही संघटनेला जनतेचा निर्णय अमान्य कऱण्याचा अधिकार नाही. मतदारांनी दिलेला निर्णय मान्य करायलाच हवा. कुठेही दंगल होणार नाही, कार्यालय फोडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे’. मोदी लाट आहे असं वाटत नाही असंही ते म्हणाले आहेत.