काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असताना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे. निवडणूक आयोगाने अत्यंत योग्य पद्धतीने २०१९ च्या लोकसभा निवडणुका घेतल्या. विविध निवडणूक आयुक्तांनी योग्य पद्धतीने निवडणुका घेतल्यामुळे भारतात लोकशाही यशस्वी ठरली अशा शब्दात प्रणव मुखर्जींनी आयोगाचे कौतुक केले.

सुकूमार सेन यांच्यापासून ते विद्यमान निवडणूक आयुक्तांपर्यंत सर्वांनीच चांगल्या पद्धतीने निवडणुका घेतल्यामुळे भारतात लोकशाही यशस्वी ठरली असे मत प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधी पक्षांकडून आयोगाच्या कार्यपद्धतीवर मोठया प्रमाणावर टीका सुरु असताना मुखर्जी यांनी आयोगाच्या कामाची प्रशंसा केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन भाजपानेही निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तिथे प्रत्येक टप्प्याच्या मतदानात हिंसाचार झाला. तिन्ही निवडणूक आयुक्त चांगले काम करत आहेत असे मुखर्जी म्हणाले. तुम्ही त्यांच्यावर टीका करु शकत नाहीत. त्यांनी योग्य पद्धतीने निवडणूक घेतली असे मुखर्जी म्हणाले.

आदर्श अचारसंहितेच्या उल्लंघनाबाबात दाखल झालेल्या तक्रारींवर फार मोठया प्रमाणात कारवाई केली नाही म्हणून निवडणूक आयोगावर विरोधीपक्षांनी टीका केली. निवडणूक आयोगाच्या तीन आयुक्तांमधील मतभेदही समोर आले होते. पंतप्रधान मोदींविरोधात कारवाई न केल्यामुळे आयोगाच्या निष्पक्षतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींसमोर शरणागती पत्करली असा आरोप केला. पूर्वी आयोगाचा आदर आणि धाक होता. तो आता उरलेला नाही असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.