पंतप्रधान मोदी यांना निवडणुकात पराभवाची भीती वाटत आहे, त्यामुळे ते जातीय आधारावर फूट पाडून पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

कृष्णानगर मतदारसंघात महुआ मोईत्रा यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत त्यांनी सांगितले की, निवडणुकात पराभव होणार हे मोदी यांना कळून चुकले आहे. त्यामुळे ते निस्तेज पडत चालले आहेत. भयगंडाचा रोग झाला आहे, ते रोज निर्थक काहीतरी बरळत असतात. त्यांना उत्तर प्रदेश, राजस्थान, नवी दिल्ली,  पंजाब, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा व इतरत्र पराभवाची भीती वाटते आहे. भाजपचा त्रिपुरात विजय झाला तर नवल नाही पण त्यामुळे त्यांना ५४३ जागा मिळणार नाहीत. त्यामुळे ते बंगालमध्ये फिरत आहेत. हिंदू-मुस्लीम यांच्यात फूट पाडून  मते मिळवण्याचा त्यांचा डाव आहे.

मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी काही केले नाही, या भाजपच्या आरोपाचा समाचार घेताना ममता म्हणाल्या, की जर तसे असेल तर लोक माझ्याकडे उत्तर मागतील.

कृष्णनगरच्या तृणमूल उमेदवार मोहुआ मोईत्रा यांना मतदान करण्याचे आवाहन करताना त्या म्हणाल्या, की जर देश वाचवायचा असले तर भाजपला मतदान करू नका. आता निवडणुकांच्या निमित्ताने मोदींना उत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे. नोटाबंदीची शिक्षा तुम्ही भाजपला दिली पाहिजे.