News Flash

‘राष्ट्रवादी’ नाव केवळ धुळफेक करण्यासाठीच?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांवर पुन्हा हल्लाबोल

‘राष्ट्रवादी’ नाव केवळ धुळफेक करण्यासाठीच?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नगरमधील प्रचार सभेत सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जलसंधारण मंत्री राम शिंदे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांवर पुन्हा हल्लाबोल; दोन पंतप्रधानांच्या मुद्यावर गप्प का?

 नगर : देशासाठी दोन पंतप्रधान हवेत, या काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे शरद पवार गप्प का आहेत, काँग्रेसकडून तर अपेक्षाच नाही, कारण जम्मू काश्मीर हे त्यांचेच पाप आहे. परंतु या शरदरावांना झालेय तरी काय, तुम्ही तर देशीवादाच्या मुद्यावर काँग्रेस सोडली, तोडली होती, मग शरदराव दोन पंतप्रधानांच्या मुद्यावर तुम्ही कुठपर्यंत गप्प बसणार आहात?, ज्या जम्मू- काश्मीरसाठी हजारो सैनिकांनी बलिदान दिले, त्याचे काय? जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान हे कोणालाच मंजूर नसताना शरदराव पुन्हा काँग्रेसबरोबर हातमिळवणी करुन विदेशी चष्म्यातून भारत पाहणार आहेत का?, तुमच्या पक्षाचे राष्ट्रवादी नाव केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठीच आहे का?, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील असूनही शरदराव तुम्हाला या मुद्यावर झोप तरी कशी लागते? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी नगरमध्ये बोलताना केली.

नगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज नगर शहराच्या सावेडी भागातील संत निरंकारी भवनशेजारील मैदानावर झाली, त्या वेळी ते बोलत होते. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीतही याच मैदानावर मोदी यांची सभा झाली होती, त्या तुलनेत उन्हाच्या कडाक्यामुळे यंदा गर्दी कमीच होती. शहरात सभा असूनही ग्रामीण भागातील लोक अधिक होते, याची चर्चा होत होती. सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. बाळासाहेब मुरकुटे, खा. दिलीप गांधी आदी या वेळी उपस्थित होते. मोदी यांचे व्यासपीठावर आगमन होताच, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास फुले अर्पण करुन अभिवादन केले.

मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधण्याच्या शैलीत भाषण केले, श्रोत्यांकडून त्यांनी ‘मै चौकीदार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशा घोषणा वदवून घेतल्या. त्यांनी मराठी भाषेतून साईबाबांच्या भूमीला वंदन करतो, श्रीरामनवमीच्या सर्वाना शुभेच्छा, अशी सुरुवात केली. गेल्या निवडणुकीच्या वेळी याच ठिकाणी घेतलेल्या सभेच्या आठवणींनाही मोदी यांनी उजाळा दिला. स्व. बाळासाहेब विखे यांचे, कोकणात वाहून जाणारे पाणी घाटमाथ्यावरुन वळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासनही मोदी यांनी दिले. काँग्रेस राजवटीचा उल्लेख मोदी यांनी घोटाळेबाज, महामिलावट असणारे, पाकिस्तानसमोर कमजोर पडणारे, सैन्य बदला घेण्याची मागणी करत असतानाही गप्प बसणारे, निर्णय न घेणारे होते, अशी विशेषणे वापरत केला. तुम्हाला असे सरकार हवे,की पाकिस्तानमध्ये घरात घुसुन मारणारे, बुलंद, दहशतवादी पाताळात दडले तरी तेथून त्यांना शोधून शिक्षा देणारे सरकार हवे, याचा निर्णय घ्या, असेही आवाहन मोदी यांनी केले. काँग्रेससारखे कमजोर सरकार हवे की राष्ट्रीय सुरक्षितता पाहणारे सरकार हवे, याचा निर्णय नवमतदारांनी घ्यावा, याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला.

कॅप्टन झाला बारावा खेळाडू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना टोले लगावले. मुख्यमंत्री म्हणाले, की विरोधकांचे कॅप्टन असलेले राष्ट्रवादीचे पवार ओपनिंग बॅटस्मन म्हणून आले आणि सात दिवसांतच बारावा खेळाडू म्हणून परतले. आपण सुजय विखे यांच्या रुपाने सर्जिकल स्ट्राईक केल्याने काँग्रेस हादरुन गेली आहे, त्यातून ते सावरलेले नाहीत. राहुल गांधींनाही आता सर्वत्र मोदींचाच चेहरा दिसू लागला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची अवस्था दयनीय झाली आहे.

‘वंचित’चा किंचितही परिणाम नाही

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले,की वंचित बहुजन आघाडीचा किंचितही परिणाम होणार नाही, वंचित आघाडीने पाहिजे तेवढी मते खावीत, त्यातून आमचाच फायदा होणार आहे. कोणत्यावेळी काय निर्णय घ्यायचा याची चांगली जाण आरपीआयला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये गेलो तर उपाशी राहण्याची वेळ येईल. भाजप आपली राज्यसभेची मुदत वाढवून देईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 2:50 am

Web Title: prime minister narendra modi attack on sharad pawar again
Next Stories
1 अनंत गितेंकडून आचारसंहितेचा भंग
2 गडचिरोलीतील चार केंद्रांवरील मतदान रद्द
3 पार्थ पवार यांना पेड न्यूज प्रकरण भोवणार?
Just Now!
X