काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी मध्य प्रदेशातील रतलाम येथे सोमवारी एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी प्रियंका गांधींचा एक वेगळं रुप पहायला मिळालं. प्रियंका गांधी लोकांना संबोधित करत असताना त्यांची नजर बॅरिकेट्सजवळ उभ्या लोकांवर पडली. सभा संपल्यानंतर मंचावरुन खाली उतरत असताना त्या गर्दीतील एका महिलेने प्रियंका गांधींना आवाज दिला. आवाज ऐकताच प्रियंका गांधी त्यांच्या दिशेने गेल्या आणि तीन फूट उंच बॅरिकेट्स ओलांडून उडी मारली आणि लोकांमध्ये पोहोचल्या.

प्रियंका गांधींना बॅरिकेट्सवरुन उडी मारताना पाहून त्यांचे सुरक्षारक्षकही काही काळ आश्चर्यचकित झाले. प्रियंका गांधींना लोकांशी गप्पा मारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लोकांनी सेल्फीसाठी विनंती केली असता प्रियंका गांधींनी त्यांची इच्छाही पूर्ण केली.

याआधी प्रचारसभेत बोलताना प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदी सरकार अहंकारी असून, हा अहंकारच त्यांचा पराभव करेल असं त्यांनी म्हटलं. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी सोमवारी इंदौर आणि उज्जैन येथे रोड शो केला आणि रतलाममध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर आरोप केला. नरेंद्र मोदी उद्योगपतींना मदत करत असल्याचं त्यांनी म्हटलं. लोकशाहीत जनता सर्वात जास्त शक्तिशाली जनता आहे, पण मोदी जनतेचं बोलणं ऐकत नाही असा आरोप त्यांनी केला.

प्रियंका गांधी यांनी राफेलवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींना वाटलं की, आकाशात ढगाळ वातावरण आहेत आता तर रडारच्या तावडीत सापडणार नाही. पण त्यांनी काहाही करो, पकडले तर गेले आहेत. त्यांनी एका अशा उद्योगपतीला काम दिलं ज्याला विमान तयार करण्याचा काहीच अनुभव नाही अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.