पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय नरेंद्र मोदींच्या शपथविधीला हजर राहणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधीसाठी त्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी आज गुरुवारी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सुत्रांनुसार, शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलेल्यांमध्ये ममता बिस्वास यांचंही नाव आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांमध्ये ममता यांचा मुलगा सुदीपदेखील होता. ममता बिस्वास पश्चिम बंगालच्या नदीया येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहीद जवान सुदीप यांची आई ममता गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचतील. या कार्यक्रमात सुदीप यांचे वडील सहभागी होणार नाहीत. प्रकृतीच्या कारणांमुळे प्रवास करणं शक्य नसल्यानेच ते अनुपस्थित राहणार असल्याचं कळत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या हावडा येते राहणारे कॉन्स्टेबल बबलू संतरादेखील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. मात्र त्यांच्या नातेवाईकांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे की नाही याची माहिती मिळू शकली नाही.

हिमाचल आणि पंजाबमधील शहिदांच्या कुटुंबीयांना निमंत्रण नाही –
पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील शहिदांच्या कुटुंबीयांना शपथविधीसाठी निमंत्रण मिळालेलं नाही. हिमाचल प्रदेशातील कागडा येथील शहीद तिलक राज यांच्या वडिलांनी शपथविधीसाठी निमंत्रण मिळालं असतं तर खूप आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया दिली आहे. एक मुलगा शहीद झाला असून दुसरा पंजाबमध्ये काम कर आहे. घरात कोणीही नसलं तरी मी शपथविधीसाठी आलो असतो असं त्यांनी सांगितलं आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून एअर स्ट्राइक करत जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत अनेक दहशतवादी ठार केले होते.