अविनाश कवठेकर

काँग्रेसचा मतदारसंघ अशी पुणे लोकसभा मतदारसंघाची दीर्घकाळ असलेली ओळख गेल्या लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत विजय संपादन करीत भाजपने पुसून टाकली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात काँग्रेसपुढे अस्तित्वाचे आव्हान उभे आहे. एकूणच राजकीय परिस्थिती भाजपला अनुकूल असल्याचे चित्र दिसते.

भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात पुणे मतदारसंघात लढत होत आहे. गेल्या वेळी भाजपचे अनिल शिरोळे हे मोदी लाटेत चांगल्या मताधिक्याने विजयी झाले होते. शहरात वाढलेली भाजपची ताकद, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पक्षाला मिळालेले स्पष्ट बहुमत, केंद्रात आणि राज्यात असलेली सत्ता या बापट यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरत आहेत. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून घोळ घालण्यात आला. बापट आणि जोशी यांचे मैत्रीपूर्ण संबंध पाहता बापट लोकसभा निवडणुकीत सहज विजयी होतील, अशी उघड चर्चा घडवली जात असतानाच शहरातील राजकीय परिस्थितीत गेल्या आठवडय़ात काहीसा बदल झाला. भाजपच्या विरोधात पक्ष, संघटनांनी उघड भूमिका घेत त्या पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेससाठी ही मदत मोलाची ठरत आहे.

पालकमंत्री म्हणून गेली साडेचार वर्षे बापट यांनी शहराच्या विकासकामांमध्ये लक्ष दिले आहे. शिवसेनेची युती झाल्यामुळे शिवसेना तसेच आरपीआय, रासप हे पक्षदेखील प्रचारात पूर्ण ताकदीने उतरल्याचे चित्र आहे. मात्र ही अनुकूलता असली तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यात भाजपची यंत्रणा किती प्रभावी ठरणार तेही महत्त्वाचे आहे.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोहन जोशी यांनी काही प्रमाणात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्या कार्यकर्त्यांची त्यांना मिळत असलेली साथ हीदेखील काँग्रेससाठी जमेची बाजू ठरत आहे. पण राष्ट्रवादीचे स्थानिक नेते तेवढे सक्रिय नसल्याचे दिसले. जोशी यांच्या रूपाने निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांला संधी मिळाल्यामुळे पक्षातील सर्व गटतट एकत्र आल्याचे चित्र आहे.

भाजप

जमेच्या बाजू

१. सर्व आमदार भाजपचे, महापालिकेत सत्ता

२. बापट यांचे सर्व राजकीय पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध

३. मेट्रोच्या कामाला सुरुवात, शहरातील अन्यही अनेक कामे मार्गी

कच्चे दुवे

१. शहरात गाजत असलेला पाण्याचा प्रश्न

२. तूरडाळ घोटाळा आणि न्यायालयाचे ताशेरे

३. शहर विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

काँग्रेस

जमेच्या बाजू

१. निष्ठावंत कार्यकर्त्यांला मिळालेली संधी

२. राष्ट्रवादीकडून दगाफटका नाही

३. भाजपविरोधी पक्ष, संघटनांची मिळत असलेली साथ

कच्चे दुवे

१. प्रचारात शेवटच्या टप्प्यात आघाडी; पण अपेक्षित जोर नाही

२. निवडणुकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिरवलेली पाठ

३. प्रचारात अनेक उणिवा, भक्कम संघटनेचा अभाव

१. निष्ठावंत कार्यकर्त्यांला मिळालेली संधी

२. राष्ट्रवादीकडून दगाफटका नाही

३. भाजपविरोधी पक्ष, संघटनांची मिळत असलेली साथ

कच्चे दुवे

१. प्रचारात शेवटच्या टप्प्यात आघाडी; पण अपेक्षित जोर नाही

२. निवडणुकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिरवलेली पाठ

३. प्रचारात अनेक उणिवा, भक्कम संघटनेचा अभाव