भ्रष्टाचाराविरोधात लढाई असल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अकाली दलाला पाठिंबा कसा देऊ शकतात, असा हल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाबमधील मजिठिया येथील जाहीर सभेत चढवला. येथील प्रत्येक उद्योग आणि क्षेत्रात एकाच कुटुंबाची एकाधिकारशाही आहे, असे म्हणत राहुल बादल कुटुंबावरही बरसले.

पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराने जोर धरला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंजाब निवडणुकांसाठी तीन दिवसांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. मजिठिया येथे राहुल यांची सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसचा पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली. अमरिंदरसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील शेतकरी जेव्हा आकाशात ढग जमा झालेले पाहतात, त्यावेळी पाऊस होईल, चांगले पीक येईल, अशा आशेने शेतकरी आनंदी होतात. पण हे बादल पंजाबला पाणीच देत नाहीत, अशी उपरोधिक टीका राहुल यांनी बादल यांच्यावर केली. राज्यातील ७० टक्के लोक अंमली पदार्थ्यांच्या आहारी गेले आहेत, असे मी चार वर्षांपूर्वी म्हणालो होतो. त्यावेळी बादल माझ्यावर हसले होते. पण आता संपूर्ण पंजाब ते बोलत आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. राज्यातील प्रत्येक उद्योगात, क्षेत्रामध्ये बादल कुटुंबीयांची एकाधिकारशाही आहे. पंजाबमध्ये तुम्हाला कुठेही जायचे असेल तर बादल यांच्या बसमधून प्रवास करावा लागेल, असेही ते म्हणाले. पंजाबला कुणी घायाळ करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना आम्ही तुरुंगात पाठवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. भ्रष्टाचाराविरोधातील लढाई असल्याचा दावा मोदी करत आहेत. पण मग ते अकाली दलाला पाठिंबा कसा देऊ शकतात? अकाली दलाने पंजाबचा नाश केल्याचे संपूर्ण देशाला माहिती आहे, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, पंजाबच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी मजिठियासह जलालाबाद, लांबी येथे प्रचार सभा घेणार आहेत. त्यांच्यासोबत कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू असणार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ४ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, ११ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.