19 June 2019

News Flash

पक्षहितापेक्षा मुलांच्या भवितव्याची चिंता

राहुल यांचा पक्षातील त्रिकुटावर हल्लाबोल

राहुल यांचा पक्षातील त्रिकुटावर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षहितापेक्षा मुलांच्या भवितव्याचा विचार केल्याचा आरोप चिदंबरम, अशोक गेहलोत तसेच कमलनाथ यांच्यावर केला. राहुल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संघर्ष करत असताना कोणीही साथ दिली नाही अशी नाराजी सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली.

या बैठकीत राहुल गांधी यांनी कामगिरीचे विश्लेषण करताना अनेक नेत्यांचे थेट नाव घेऊन नाराजी व्यक्त केल्याचे पक्षनेत्यांनी सांगितले. गांधी कुटुंबीयातील कोणाकडे पक्षाची धुरा नको असे त्यांनी सांगितले. चार तास चाललेल्या या बैठकीत प्रियंका गांधी यांनी दोन वेळा संताप व्यक्त केला.

जे पराभवाला जबाबदार आहेत ते सर्व जण या खोलीत बसले आहेत अशा शब्दात प्रियंकांनी नाराजी व्यक्त केली. काही नेत्यांनी राहुल यांना तुम्ही राजीनामा देऊ नका असे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रियंका यांनी हस्तक्षेप करत राहुल जेव्हा एकाकी लढत होता तेव्हा तुम्ही कोठे होतात? असा सवाल केला. राफेल व ‘चौकीदार चोर है’ या मुद्दय़ांवर राहुलला कुणी पाठिंबा दिला नाही असे प्रियंका यांनी बजावले.

प्रदेश पातळीवर पक्ष बळकट करा अशी सूचना ज्योतिरादित्य शिंदे यांनी करताच, राहुल यांनी चिदंबरम यांच्याकडे पाहात, मुलाला उमेदवारी नाकारली तर राजीनाम्याची धमकी चिदंबरम यांनी दिल्याचा गौप्यस्फोट केला. तर मुलाला उमेदवारी दिली नाही तर मुख्यमंत्री म्हणून कसा राहणार? असा कमलनाथ यांचा सवाल होता. अशोक गेहलोत यांनी मुलाच्या प्रचारासाठी जोधपूरमध्ये आठवडाभर तळ ठोकला होता. त्यामुळे राज्याकडे दुर्लक्ष झाल्याची राहुल यांची नाराजी होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या असून, १८ राज्यांमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही.

‘राफेल’वरून एकाकी पडल्याची भावना

राफेलवरून जी मोहीम उघडण्यात आली त्यावर किती जणांनी पाठिंबा दिला असा राहुल यांचा सवाल होता. त्यावर काही नेत्यांनी हात वर करून राफेलवर बोलल्याचे सांगितले. राहुल यांनी मात्र हे अमान्य केले.

First Published on May 27, 2019 1:15 am

Web Title: rahul gandhi speech