पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांना ए-सॅट म्हणजे रंगभूमीवरील सेट वाटला असा टोला लगावला आहे. सेट आणि ए-सॅटमधील फरक न समजणाऱ्यांची कीव येते असंही ते पुढे म्हणाले आहेत. हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा नायनाट करणाऱ्या ‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत ही माहिती दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं (डीआरडीओ) अभिनंदन करत नरेंद्र मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. राहुल गांधींच्या या टीकेला नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदींनी सांगितलं की, ‘रंगभूमीवर कधी गेलात तर तिथे नेहमी सेटची चर्चा सुरु असते. सेटचं काम झालं का? सेट व्यवस्थित लागला आहे का ? मी जेव्हा काल ए-सॅटबद्दल सांगत होतो तेव्हा काहीजणांना रंगभूमीवरील सेटबद्दल बोलत असल्याचं वाटलं. आता त्यांच्यावर हसायचं की रडायचं हेच कळत नाही. त्यांची कीव येते’.

रशिया, अमेरिका आणि चीनपाठोपाठ उपग्रहनाशक क्षेपणास्त्र चाचणीत यश
‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. ‘मिशन शक्ती’ या खास चाचणी मोहिमेद्वारे अवघ्या तीन मिनिटांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संशोधकांनी हे यश मिळवले, ही शुभवार्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास संदेशाद्वारे देशवासीयांना दिली.

भारतीय अंतराळ संशोधकांनी पृथ्वीलगत असलेल्या ध्रुवीय कक्षेतील आपल्या एका नमुना उपग्रहाचा वेध घेत तो तीन मिनिटांत पाडून टाकला. या शोधाद्वारे आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केलेला नाही, तर केवळ स्वरक्षणार्थ हे पाऊल उचलले आहे, असे मोदी यांनी दूरदर्शनवरील संदेशात सांगितले.

अंतराळातील शत्रुराष्ट्राचा उपग्रह पाडण्याचे तंत्रज्ञान रशियाने मिळवल्याची कुणकुण लागल्यानंतर अमेरिकेने मे १९५८ ते ऑक्टोबर १९५९ या कालावधीत ‘ए-सॅट’ मोहीम राबवली. मात्र अनेक चाचण्या अयशस्वी ठरल्यानंतर १९८०च्या दशकात ही मोहीम अमेरिकेच्या हवाई दलाने रद्द केली. त्यानंतर काही काळाने पुन्हा अमेरिकेने ही मोहीम सुरू केली आणि २० फेब्रुवारी २००८ला अमेरिकेला ‘ए-सॅट’ची यशस्वी चाचणी घेता आली. अमेरिकेने अंतराळातील आपलाच एक नादुरुस्त झालेला उपग्रह त्यावेळी पाडला होता. मात्र त्याआधीच म्हणजे ११ जानेवारी २००७ रोजी चीनने आपला एक हवामानविषयक उपग्रह ‘ए-सॅट’द्वारे पाडून या मोहिमेत आघाडी घेतली होती. चीनने पाडलेला उपग्रह हा पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेत ८६५ किलोमीटरवर होता, तर भारताने पाडलेला उपग्रह हा ३०० किलोमीटरवर होता. चीनने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी २००५ आणि २००६ मध्येही केली होती. रशियाने मात्र आपल्या ‘ए-सॅट’ क्षेपणास्त्राची पहिली अधिकृत चाचणी १८ नोव्हेंबर २०१५ मध्ये केली. मे २०१६ मध्ये त्यांची दुसरी चाचणीही यशस्वी झाली. आता या श्रेणीत भारताने स्थान मिळवले आहे.