केरळचे माजी खासदार जॉयस जॉर्ज यांच्यावर सध्या टीकेचा भडीमार होतानाचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे नेते आणि वाय्यनाडचे खासदार राहुल गांधींवर राजकीय टोलेबाजी करताना जॉर्ज यांनी मर्यादा ओलांडल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. राहुल गांधी अविवाहित आहेत म्हणूनच विद्यार्थ्यींनी त्यांच्यासमोर वाकू नये अशा आक्षेपार्ह शब्दामध्ये या खासदाराने राहुल यांच्यावर टीका केलीय.

सीपीआयचे (एम) उमेदवार आणि नेते एम. एम. मणी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये जॉर्ज यांनी राहुल यांच्याबद्दल वक्तव्य करताना मुलींनी राहुल यांच्यापासून संभाळून रहावं त्यांचं अजून लग्न झालेला नाही, असं वक्तव्य केलं. “राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे आयोजन अशापद्धतीने करण्यात आलं आहे की ते केवळ विद्यार्थीनी असणाऱ्या कॉलेजेसला भेट देतात. तिथे ते मुलींना वाकण्यासंदर्भात शिकवण देतात. (teach girls to bend) माझी सर्व विद्यार्थिनींना विनंती आहे ती त्यांनी राहुल गांधीसमोर वाकून उभं राहू नये. त्यांचं लग्न झालेलं नाही,” असं वक्तव्य जॉर्ज यांनी केलं आहे. लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रण्टच्या पाठिंबाव्यावर जॉर्ज हे यापूर्वी अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. जॉर्ज यांनी हे वक्तव्य केल्यानंतर मंचावर उपस्थित असणारे मणी यावर हसताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

केरळ काँग्रेसने या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं म्हटलं आहे. सीपीआयला पराभव दिसू लागल्याने राहुल यांच्याबद्दल अशी वक्तव्य केली जात असल्याचा टोला काँग्रेसने ट्विटरवरुन लगावला आहे.

राहुल गांधी यांनी नुकतीच कोच्चीमधील संत टेरेसा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता. केरळमध्ये सहा ए्प्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल यांच्या संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राहुल यांनी या भेटीदरम्यान मुलींना ऐकिडोचे धडे देतानाही दिसले. महिलांनी स्वत:चं संरक्षण कसं करावं यासंदर्भातील काही गोष्टीही राहुल यांनी येथील मुलांनी सांगितल्या होत्या.

भारतामध्ये कायमच महिला म्हणून तुम्हाला मागे ढकललं जाईल. मात्र तुम्ही सतत पुढे जात राहणं गरजेचं आहे. तुम्हाला मागे का ढकललं जात आहे हे तुम्ही ओळखायला पाहिजे आणि त्यानुसार प्रतिकार केला पाहिजे. तुम्हाला मागे ढकलू पाहणारे कोण आहे हे ओळखून तुम्ही समाजामध्ये स्वत:ची जागा निर्माण केली पाहिजे, असं आवाहन राहुल यांनी या महाविद्यालयातील मुलींना केलं होतं.