काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ नंतर दुसऱ्यांदा हा काँग्रेसला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा देत राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. ही घोषणा देशभरात विरोधकांनी पोहचवली, मात्र या घोषणेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या नकारात्मक प्रचाराचा काहीही परिणाम मतदानावर झाला नाही. राहुल गांधी यांनी केलेला नकारात्मक प्रचार आम्हाला भोवला असंही मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलं आहे.

मतदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवत भाजपाला ३०० पेक्षा जास्त जागांवर निवडून दिलं. आता याच पराभवाची कारणं काय आहेत? नेमकं कुठे चुकलं? काय धोरण असायला हवं होतं? या सगळ्याचं मंथन करण्यासाठी काँग्रेसने बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली जाणार आहे. ज्यामध्ये काँग्रसेच्या पराभवाचं मंथन केलं जाणार आहे.

दरम्यान राहुल गांधी यांची प्रचार मोहीम अपयशी ठरली असा सूर आता काँग्रेसच्याच वरिष्ठांकडून आळवला जातो आहे. काँग्रेससाठी राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली पुढचा लढा दिला जाणं कठीण होत जाणार आहे असं काँग्रेसच्याच एका नेत्याने इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे. मी राजकारणात आहे माझी बहीणही राजकारणात येऊ शकते हे मागच्या पिढीने सहन केलं. मात्र तरूण पिढी हे सहन करणं, स्वीकारणं कठीण आहे त्याचाच फटका आम्हाला बसला आहे असंही या नेत्याने सांगितलं आहे. काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी जो संवाद साधला त्यात त्यांनी राहुल गांधी यांचा नकारात्मक प्रचार भोवला अशी प्रतिक्रिया दिली आहे. चौकीदार चोर है हे पंतप्रधानांबाबत बोललं जाणं नकारात्मक होतं. त्याला प्रतिसाद मिळतो आहे असं वाटलं मात्र ती आमची चूक होती असंही या नेत्यांनी मान्य केलं आहे.

राहुल गांधी यांनी प्रचारासाठी खूप मेहनत घेतली यात काहीही शंका नाही. मात्र त्यांच्या भाषणांमधून अनेक मुद्दे पुन्हा पुन्हा सांगितले गेले. जे लोकांच्या पसंतीस उतरले नाहीत. एवढंच नाही तर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये जो हवाई हल्ला करून प्रत्युत्तर देण्यात आले त्याचा सर्वाधिक फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पर्यायाने भाजपाला झाला. लोकांनी भाजपाचे उमेदवार पाहून मतं दिली नाहीत तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवायचे आहे या उद्देशाने मतं दिली असंही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. एवढंच नाही तर काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांन २६/११ बाबत जे वक्तव्य केलं तसंच १९८४ च्या दंगलींबाबत जे वक्तव्य केलं ते आम्हाला भोवलं असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

नेमका पराभव का झाला? काय काय घडलं? काय बिघडलं? या सगळ्याची कारणं आम्ही आज होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शोधणार आहोत असंही या सगळ्यांनी म्हटलं आहे. भविष्यात यावेळी केलेल्या चुका टाळण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी आशाही या नेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते हजर रहाणार आहेत.