गोमांस आणि त्यावरून झालेले हिंसाचाराचे प्रकार यावरूनही राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. गोमांस बाळगण्याच्या आरोपावरून देशात शंभरपेक्षा जास्त जणांना जमावाने केलेल्या हिंसाचारात ठार केलं गेलं आहे. उत्तर प्रदेशात तर अशी घटना घडली की गोमांस असल्याच्या संशयावरून एका माणसाला ठार केलं, त्यानंतर समजलं की गोमांस नव्हतं तर मटण होतं. मग त्या माणसाच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे असा प्रश्न राज ठाकरेंनी भाषणात विचारला. एवढंच नाही तर सगळेजण गायी कापत असते तर दूध कोणी दिलं असतं असा खोचक प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला.

यावेळी राज ठाकरेंनी देशातील विविध राज्यांमध्ये गायींची अवस्था काय आहे ते दाखवले. राजस्थानात ७० हजार गायी अन्न न मिळाल्याने मेल्या. छत्तीसगढ २०० गायी मेल्या ही उदाहरणं राज ठाकरेंनी दिली. समाजात तेढ निर्माण करायची. हा बीफ खातो, हा असं करतो, हे सगळे मुस्लिम असतात. गोहत्या, गोमांस, गोरक्षण यावरून जे काही सुरु होतं त्यावर आता मोदी काय म्हणतात ते बघा असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींची एक क्लिपही सादर केली. या क्लिपमध्ये मोदी असं म्हणत आहेत, एनडीएच्या कार्यकाळात मीट एक्स्पोर्ट मोठ्या प्रमाणावर झालं, या व्यवसायाशी एक समाज जोडला गेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला. त्यावर मोदी म्हटले, नेमकी काय समस्या होती ते मी पहातो, आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही. मात्र त्यावेळी दूध न देणाऱ्या गायींचं प्रमाण वाढलं असेल, त्यातून असा निर्णय घेतला गेला असेल. पण तुमची ही माहिती योग्य नाही एक विशिष्ट समाज या व्यवसायाशी जोडला गेला आहे. माझे काही जैन मित्र आहेत तेदेखील या व्यवसायात आहेत असं मोदींनी म्हटल्याचं राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणादरम्यान दाखवलं.

यानंतर हाच मुद्दा उचलून राज ठाकरेंनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जैन मित्र आहेत मग एवढा सगळा हंगामा देशभरात तुम्ही घातलात असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. गोमांसावरून हिंसाचाराच्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही या सगळ्याबद्दल काहीही भाष्य का केलं नाही? कुठे घेऊन जायचा होता देश तुम्हाला असेही राज ठाकरेंनी विचारला आहे.