मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा संपला असला तरी त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चर्चा सोशल नेटवर्किंगवर अद्यापही सुरुच आहे. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून विनोद तावडे आणि भाजपा ट्विटर हॅण्डलवरही याच ‘लाव रे तो व्हिडिओ’वरुन राज ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र नुकतीच राज ठाकरे यांनी एक मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे काही ठरवून केलेले कॅम्पेन नसल्याचे सांगतानाचा या कॅम्पनेमधून त्यांना काय अपेक्षित आहे याची माहिती दिली.

१२ एप्रिल रोजी नंदूरबारमध्ये राज ठाकरे यांच्या सभेमध्ये पहिल्यांदाच त्यांनी व्हिडिओ दाखवून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टिका केली होती. आधी हे नेते काय बोलेले आणि आत्ता काय बोलत आहेत असं या व्हिडिओमधून राज यांनी लोकांसमोर मांडले. या स्मार्ट सभेनंतर सोशल नेटवर्किंगवर ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे शब्द चांगलेच चर्चेच आहे. याचसंदर्भात राज यांना एका मुलाखतीमध्ये विचारले असता त्यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे काही ठरून केलेले कॅम्पेन नसल्याचे म्हटले आहे. ‘माझ्या सगळ्या सभांमध्ये मी केवळ एकदा किंवा दोनदा ‘लवा रे तो व्हिडिओ’ बोललो आहे. हे शब्द मी सतत सभेत बोलत नव्हतो,’ असं राज यांनी स्पष्ट केले. तसेच पुढे बोलताना राज यांनी ‘मी काय बोलणार आहे किंवा काय बोलतोय हे त्या (व्हिडीओ) टीमला ठाऊक असतं. त्यामुळे ‘लवा रे तो व्हिडिओ’ हा डायलॉग नसून मी केवळ माझ्या टीमला तो व्हिडिओ लावायला सांगतो,’ अशी माहिती दिली. हे काही ठरवून केलेलं नसून हा काही डायलॉग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच संदर्भात एक किस्सा सांगताना राज म्हणाले, ‘एकदा सलीम जावेदमधले सलीम मला सांगत होते. लोकं मला म्हणतात ‘तुम्ही कितने आदमी थे’, ‘कितना इनमा रखा है सरकारने हम पर’ यासारखे छान डायलॉग लिहिलेत तुम्ही. त्यावर सलीम ‘हे डालयॉग नाहीत हे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगतेय इतकचं आहे असं सांगायचे. तरी लोकांना तो डायलॉग वाटायचा. तसंच माझ्या या लाव रे तो व्हिडिओचं झालयं.’

सभांमध्ये व्हिडिओ दाखवण्याची कल्पना कुठून आली याबद्दलही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ‘व्हिडिओ दाखवण्याचा निर्णय काही मागील महिन्यांमधील नाही तर मागील एक ते दोन वर्षांमध्ये लोकं मला व्हॉट्सअपच्या क्लिप दाखवायचे0. त्या क्लिप सगळ्यांकडे फिरायच्या. याच व्हायरल होणाऱ्या गोष्टी लोकांसमोर रिमांडर म्हणून देऊ शकलो तर काय हरकत आहे असा विचार करुन व्हिडिओची संकल्पना अंमलात आणल्याचे राज म्हणाले. ‘मी व्हायरल होणाऱ्या सगळ्या क्लिप्स काढल्या आणि त्या योग्य पद्धतीने सभांमधून मांडल्या असं सांगतानाच राज यांनी, या क्लिप मी केवळ दाखवत नाही तर त्या मी लोकांना समजावून सांगत असल्याचे म्हटले आहे. ही माणसं आगोदर काय बोलत होती आता काय बोलतायता हे सांगतोय. जी स्वप्न मोदींने देशाला दाखवली त्या स्वप्नांबद्दल आता ते एक शब्द काढायला तयार नाहीयत. जवानांबद्दल त्याचे मत काय होते आणि आता ते काय करतायत या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

या व्हिडिओंचा काय परिणाम व्हायला हवा याबद्दलही एकदा मनसे नेत्यांची चर्चा झाल्याचे राज यांनी या वेळी बोलताना सांगितले. ‘दौऱ्यावरुन एकदा गाडीतून जाताना अनिल शिदोरे यांच्याबरोबर बोलताना मी म्हटलं की या व्हिडिओंमधून एक गोष्ट झाली पाहिजे ती अशी की कोणतेही राजकारणी लोकांसमोर जाताना खोटं नाही बोलणार. किंवा आपण काय बोलून ठेवलयं हे लोकांसमोर मांडावं लागेल किंवा करावं लागेल याचा विचार करतील. केलेल्या कामांचा न केलेल्या कामांचा लेखाजोखा द्यावा लागेल हे लक्षात ठेवतील’ अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

सभांमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा ही काही पहिलीच वेळ नाही असं राज यांनी सांगितले आहे. ‘हे असं मी नाशिकच्या महापालिकेच्या निवडणुकांच्या वेळीही केलं होतं पण तेव्हा जास्त काही प्रसारमाध्यमांना आकर्षित करणारं त्यात नसल्याने प्रसारमाध्यमांनी त्याकडे पाठ फिरवली होती असंही राज या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.