जयेश सामंत / नीलेश पानमंद

ठाण्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून ८० हजारांहून अधिक मताधिक्य; नवी मुंबईतूनही परांजपेंच्या तुलनेत ८४ हजार अधिक मते

ठाणे लोकसभा मतदारसंघातून गतवेळच्या तुलनेत दुप्पट मताधिक्य मिळवणारे शिवसेनेचे राजन विचारे हे राज्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्यांत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघातील ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी आणि ठाणे शहर या तीन विधानसभा मतदारसंघांतून प्रत्येकी ८० हजारांचे मताधिक्य शिवसेनेचे विजयी उमेदवार राजन विचारे यांनी मिळवले. त्याचवेळी नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघांतून विचारे यांना ८४ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये मीरा रोड, ओवळा-माजिवाडा, कोपरी-पाचपखाडी, ठाणे शहर, ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना २ लाख ८१ हजार २९९ इतके मताधिक्य मिळाले होते. मात्र, यंदा त्यांनी ४,१२,१४५ इतके मताधिक्य मिळवत आपली आणि युतीची ताकद वाढल्याचे दाखवून दिले.

ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे महापालिका शिवसेनेच्या, मीरा-भाईंदर महापालिका भाजपच्या आणि नवी मुंबई महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. तसेच सहापैकी केवळ म्हणजेच ऐरोली विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात आहेत. नवी मुंबई महापालिका आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघ ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांनी ऐरोली मतदारसंघातून परांजपे यांना ५० हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याचा दावा केला होता. मात्र, या मतदारसंघातून विचारे यांनीच ४४ हजारांचे मताधिक्य मिळवले.

ठाण्यात वर्चस्व कायम

ठाण्यातील ओवळा-माजिवाडा, कोपरी पाचपखाडी आणि ठाणे शहर या तिन्ही मतदारसंघांतून राजन विचारे यांनी सर्वाधिक मताधिक्य घेतले. विचारे यांना ३ लाख ९३ हजार ७९० इतकी मते मिळाली असून त्यामध्ये दोन लाख ५७ हजार १७५ मतांचे मताधिक्य मिळाले आहे.

मीरा-भाईंदरचे गणितही फसले

मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. या विचारानेच राष्ट्रवादीने हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांनी राष्ट्रवादीला मताधिक्य मिळवून देण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, येथून विचारे यांनी ६९ हजारांचे मताधिक्य मिळवले.