लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवरुन काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असतानाच काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजपावर पलटवार केला आहे. भाजपाचा पाठिंबा असलेल्या व्ही पी सिंग सरकारने राजीव गांधी यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवली नाही, असा आरोप त्यांनी केला असून राजीव गांधी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण असा सवालही पटेल यांनी विचारला आहे.

नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून प्रचारात राजीव गांधी यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. बोफोर्स घोटाळ्यावरुन नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असून  राजीव गांधी यांच्यावरील टीकेवर अहमद पटेल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अहमद पटेल हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अहमद पटेल ट्विटमध्ये म्हणतात, शहीद झालेल्या पंतप्रधानांवर टीका करणे हा भ्याडपणाच आहे. राजीव गांधी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण, भाजपाचा पाठिंबा असलेल्या व्ही पी सिंग सरकारने राजीव गांधी यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यास नकार दिला. गुप्तचर यंत्रणांनी इशारा देऊनही त्यांच्यासोबत फक्त एकच पीएसओ देण्यात आला होता.

राजीव गांधी यांनी द्वेषाच्या राजकारणामुळेच जीव गमावला. खोटे आरोप आणि अपशब्दांवर प्रत्युत्तर देण्यासाठी ते आता आपल्यात नाहीत, असे अहमद पटेल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लक्ष्य करणे सुरुच ठेवले आहे. राजीव गांधी हे पंतप्रधान असताना आयएनएस विराट या युद्धनौकेवर त्यांनी कुटुंबियांना सुटीत सहलीला नेले. त्यातून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभेत केला होता.