रामदास आठवले यांची टीका

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने काही उमेदवार उभे केले आहेत, पण ते निवडून येणार नाहीत. त्यांना निवडून यायचे असेल, तर त्यांनी सुद्धा महायुतीत सामील व्हावे. वंचित बहुजन आघाडी ही आता किंचित आघाडी झाली आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी केली.

पुणे जिल्ह्य़ातील महायुतीच्या उमेदवारांसाठी आठवले यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे या वेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला एक जागा लढवायची होती. ती जागा शिवसेनेची होती. माझ्यासाठी जर एखादा मतदारसंघ सोडावा लागला असता, तर शिवसेना आणि भाजपची युती तुटली असती. तसे होऊ  नये, म्हणून मी अखेर माघार घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही आता खासदार आणि मंत्रीपण आहात. तुमची ही पदे कायम ठेवू असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही माघार घेऊन महायुतीमध्ये सामील झालो आहोत.

माझे पवारांवर प्रेम

बारामतीमध्ये प्रचाराला जाणार असून बारामती मला फार आवडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या ठिकाणी होणार आहे. या सभेच्या वेळी मी नक्की जाणार आहे. शरद पवार हे माझे पूर्वीपासूनचे मित्र असून माझे त्यांच्यावर प्रेम आहे. मात्र, निवडणुकीत नाही. पवारांचे  माझ्यावर प्रेम आहे, की नाही हे मात्र अद्याप समजलेले नाही, अशी कोपरखळीही आठवले यांनी मारली.