|| मधु कांबळे

रामदास आठवले यांची भूमिका

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आपला पक्ष सहभागी असताना लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली गेली नाही, भाजपकडून जो राजकीय सन्मान मिळायला पाहिजे होता, तो मिळाला नाही, मात्र आपला पक्ष भाजपसोबतच राहणार, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडली. भाजपच्या हिंदुत्वाबद्दल आपले मतभेद आहेत आणि गोवंश हत्याबंदी कायद्याला तर आपला विरोधच आहे. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग चांगला आहे, परंतु मतांमध्ये त्याचे कसे रूपांतर होते, त्यावर त्यांच्या या प्रयोगाचे यशअपयश अवलंबून राहणार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

  • एकही जागा न सोडून भाजपने आपला राजकीय सन्मान केला नाही, असे वाटते का?

लोकसभेची एकही जागा न दिल्यामुळे आमच्या पक्षाचा राजकीय सन्मान झाला नाही, हे खरे आहे. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे. पक्षासाठी मी मागितलेली जागा देण्याच्या संदर्भात विचार व्हायला हवा होता. ईशान्य मुंबईची जागा दिली असती तरी देशभर एक चांगले चित्र उभे राहिले असते; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला समजावून सांगितले. त्यांना खात्री नव्हती की कमळ चिन्हावर न लढवल्यास ईशान्य मुंबईची जागा निवडून येते की नाही. मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, असे त्यांना सांगितले होते. त्यांची अडचण नको म्हणून त्यांनी ती जागा मला दिली नाही. राजकीय सन्मान झाला नाही, त्यामुळे मी थोडा नाराज होतो; परंतु दुसरा कुठलाही पर्याय आपल्यासमोर नव्हता. मात्र मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ ३० ते ४० कार्यकर्त्यांना महामंडळे देण्याचे मान्य केले आहे. एका कार्यकर्त्यांला राज्यात मंत्रिपद देण्यात येणार आहे. एक-दोन महामंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद देण्याचे मान्य केले आहे.

  • भाजपच्या जाहीरनाम्यात हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा आणला आहे, त्याला आपला पाठिंबा आहे का?

एक तर आमचा हिंदुत्वाला पाठिंबा नाही, पण राष्ट्रीयत्वाला पाठिंबा आहे. त्यांची अलीकडची भूमिका अशी आहे की, आमचे हिंदुत्व हे सनातनी नाही, कर्मठ  नाही. ते राष्ट्रवादाशी जोडले गेलेले आहे. त्या मुद्दय़ावर काही प्रमाणात आपले मतभेद आहेत; परंतु राम मंदिराच्या मुद्दय़ावर आमची भूमिका अशी आहे की, मुस्लिमांवर दबाव आणून राम मंदिर होता कामा नये. सर्वसंमतीने राम मंदिर झाले पाहिजे. राम मंदिराशी हिंदू धर्मीयांचे भावनिक नाते आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याशिवाय कायदा हातात घेऊन राम मंदिर बांधू नये, असे माझ्या पक्षाचे मत आहे. हा त्यांचा अजेंडा आहे, त्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत नाही. मूळ जागा बुद्ध मंदिराची आहे, त्यामुळे हिंदू, मुस्लीम व बौद्ध  यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. अयोध्येतील त्या जागेत मंदिर, मशिदीबरोबर बौद्ध मंदिरही असावे, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे.

  • भाजपचा दुसरा एक अजेंडा आहे, गोवंश हत्याबंदीचा, त्याचा गेल्या पाच वर्षांत दलित व मुस्लीम समाजाला खूप त्रास झाला आहे, त्याबद्दल आपले काय मत आहे?

महाराष्ट्र सरकारच्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा नाही. आमचा पाठिंबा गोहत्याबंदीला होता, कारण या देशातल्या हिंदूंच्या भावना त्याच्याशी निगडित आहेत, परंतु गोवंश हत्याबंदीची आवश्यकता नसताना राज्य सरकारने हा कायदा लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचा त्या कायद्याला विरोध आहे. विनाकारण जे हल्ले होतात ते थांबले पाहिजेत. उनामधील दलितांना झालेली मारहाण, दादरीमधील मुस्लिमांवर झालेला हल्ला ही गंभीर बाब होती. फार वाईट अशा तीन-चार घटना घडल्या.

  • सत्तेपासून वंचित राहिलेल्या वेगवेगळ्या समूहांना एकत्र करून उभी केलेली प्रकाश आंबेडकरप्रणीत वंचित बहुजन आघाडी हा रिपब्लिकन ऐक्याला पर्याय आहे का आणि वंचित आघाडीचा निवडणुकीत काय परिणाम होईल?

वंचित आघाडी हा रिपब्लिकन ऐक्याला पर्याय होऊ शकत नाही. वंचितांना एकत्र करण्याची चांगली भूमिका आहे. ज्यांना कधी सत्ता मिळाली नाही, त्यांना सत्ता मिळवून देण्याचा हा चांगला प्रयोग आहे; परंतु प्रकाश आंबेडकरांच्या या प्रयोगातून वंचितांना सत्ता मिळणार नाही. कारण महाराष्ट्राचे जे राजकारण आहे ते एका बाजूला भाजप-शिवसेना व दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी, तिसऱ्या पर्यायाला लोक तेवढा चांगला प्रतिसाद देत नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या सभांना काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला हे आम्हाला मान्य आहे. २००९ मध्ये आम्ही रिडालोस स्थापन केली होती. त्या वेळीही सभांना असाच चांगला प्रतिसाद मिळत होता. शिवाजी पार्कवरची आमची सभाही त्या वेळी फार मोठी झाली होती; पण मते आम्हाला मिळाली नाहीत. आरपीआयचा एकही माणूस निवडून आला नाही. या वेळी वंचित आघाडीचा शिवसेना-भाजपलाच फायदा होणार आहे. रिपब्लिकन ऐक्य आणि सोबत वंचित आघाडी असे काही तरी भविष्यात होत असेल तर तो एक वेगळा प्रयोग होईल, असे मला वाटते. मी किती तरी वेळा सांगितले आहे की, प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावे आणि कुठे तरी आपण दुसऱ्या मोठय़ा पक्षाबरोबर युती करावी, त्याशिवाय सत्ता मिळणार नाही.