सोमावारी राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून सर्वच पक्षाचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईतही प्रचाराचा जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या प्रचारसभेमध्ये केंद्रीय मंत्री रामदार आठवले हेही कवितांच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. मुंबईत काल झालेल्या एका सभेमध्ये आठवलेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर कवितेच्या माध्यमातून टिका केली. ‘राज तुम्ही करू नका जास्त नखरे कारण बाळासाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे’ अशी कविता करत आठवलेंनी राज यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबईतील लोकसभा मतदार संघातील एका प्रचारसभेत ते बोलत होते. या मतदारसंघातून शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपावर आपल्या भाषणांमधून निशाणा साधणाऱ्या राज यांच्यावर आठवले यांनी टिका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आधीच ५६ विरोधक एकत्र आले असून त्यात आता ५७ नंबरला राज ठाकरे आले तरीही काही फरक पडणार नाही’ असे आठवले म्हणाले. राज ठाकरेंकडे सभेला गर्दी करण्याची ताकद आहे पण उमेदवार निवडूण आणण्याची ताकद आमच्याकडे असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंनी आधी मोदींच्या बाजूने बोलत होते याची आठवण आठवलेंनी आपल्या भाषणातून करुन दिली. ‘राज ठाकरे आठ दिवस गुजरात मधील विकासकामे पाहण्यासाठी राज यांनी आठ दिवसांचा दौरा केला होता. महाराष्ट्र सरकारने गुजरात सरकारची भूमिका स्वीकारावी असंही राज त्यावेळी म्हणाले होते. मात्र हेच राज ठाकरे आजमोदींवर टीका करत आहे. बाळासाहेबसुद्धा टीका करायचे पण अशी टीका त्यांनी कधी केली नसल्याची आठवणही आठवलेंनी करुन दिली. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी कविता करत राज यांच्यावर निशाणा साधला.

“राष्ट्रवादी – काँग्रेस सोबत गेले आहेत राज…
म्हणुनच इथे आलो आहे मी आज..
कारण मला जिरवायचा आहे महाआघाडीचा माज…”

कालच मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पनवेलमधील कामोठे घेण्यात आलेल्या प्रचारसभेमध्येही आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून टिका केली.

“नका मारु विनाकारण बढाई
नरेंद्र मोदींच जिंकणार आहेत २०१९ ची लढाई”

२३ एप्रिल रोजी दहिसरमध्ये गोपाळ शेट्टींच्या प्रचारासाठी झालेल्या महायुतीच्या सभेमध्येही आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून काँग्रेसच्या उमेदवार उर्मीला मातोंडकर यांच्यावर टिका केली होती.

“२३ मे ला उर्मीला मातोंडकरांची होणार आहे सुट्टी
कारण निवडून येणार आहे गोपाळ शेट्टी
नरेंद्र मोदी ह्यांनी मजबूत केली आहे विकासाची भट्टी
म्हणून मी घेतली आहे आघाडी शी कट्टी”

आठवले यांच्या कविता कायमच चर्चेत असतात मात्र सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने प्रचारसभांमधील आठवलेंच्या कविता व्हायरल होताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale criticize mns chief raj thackeray
First published on: 25-04-2019 at 15:13 IST