मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या भाजपच्या निर्णयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सहकारी असलेल्या रामदास आठवले यांनी रविवारी टीका केली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ठाकूर यांचे नाव आरोपी म्हणून आले आहे आणि हेमंत करकरे यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा होता, असे ठाकूर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले. आरपीआयने लोकसभा निवडणुकांसाठी मध्य प्रदेशात जबलपूर, सतना, रतलाम, मुरेना व सिधी या ठिकाणांहून उमेदवार उभे केले आहेत. उर्वरित २४ मतदारसंघांत आपला भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याचे आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी ठाकूर यांना उमेदवारी देण्याचे समर्थन केले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेही एका प्रकरणात जामिनावर असल्याचे लक्षात घेता यात काहीच चुकीचे नसल्याचे त्या म्हणाल्या. शनिवारीही त्यांनी प्रज्ञासिंह या ‘थोर संत’ असल्याचे म्हटले होते. मध्य प्रदेशात भाजपचा हिंदू चेहरा म्हणून ठाकूर या तुमची जागा घेतील काय असे विचारले असता, ‘त्या महान संत आहेत. त्यांच्याशी माझी काय बरोबरी?’ असे उत्तर उमा भारती यांनी दिले होते.